Wed, Jan 23, 2019 14:50होमपेज › Goa › मुख्यमंत्रिपदी पर्रीकर असेपर्यंत  सरकारला पाठिंबा कायम   

मुख्यमंत्रिपदी पर्रीकर असेपर्यंत  सरकारला पाठिंबा कायम   

Published On: Mar 09 2018 1:34AM | Last Updated: Mar 09 2018 12:09AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्रिपदी मनोहर पर्रीकर असेपर्यंत मगोचा राज्य सरकारला पाठिंबा कायम राहणार आहे, असा पुनरुच्चार करून प्रसंगी आगामी लोकसभा, तसेच विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी असल्याचे महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले.

सांतइनेज येथील मगोच्या कार्यालयात गुरुवारी संध्याकाळी केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली.  या बैठकीनंतर ढवळीकर पत्रकारांशी बोलत होते.

ढवळीकर म्हणाले की, मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारसोबत मगोने युती केली आहे. जोपर्यंत पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असतील, तोपर्यंत मगो सरकारसोबत असणार असल्याचे वचन पक्षातर्फे देण्यात आले आहे. हे वचन मगो पाळण्यास कटिबद्ध आहे. लोकशाहीत पक्षाची वाढ व अस्तित्व टिकवण्यासाठी मगो स्वतंत्रपणे 2019 साली होणार्‍या लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. विधानसभा निवडणूकही झाल्यास मगो स्वतंत्रपणे त्यात उतरणार आहे. 

मगोच्या 55 व्या वर्धापनदिनी म्हापसा येथे 10 मार्च रोजी नियोजित कार्यक्रमाची  तयारी करण्यासाठी सदर  बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत ढवळीकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गोव्याचे भाग्यविधाते तथा राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी रूजवलेल्या मगो पक्षाला जनमानसात अजूनही स्थान आहे. बांदोडकर यांचे कार्य सामान्य जनतेला कळावे आणि येणार्‍या निवडणुकीच्या तयारीसाठी 10 मार्च पासून मोर्चेबांधणी सुरू केली जाणार आहे. पक्षाच्या स्थापनादिनी फर्मागुडी येथे बांदोडकर यांच्या पुतळ्याला हार घालून मिरवणुकीने म्हापशाला जाणार आहे. म्हापशातील बोडगेश्‍वर मंदिराजवळील सभागृहात होणार्‍या स्थापना दिन कार्यक्रमात मगोच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार आहे.