Mon, Mar 25, 2019 13:38होमपेज › Goa › डीएड शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा  

डीएड शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा  

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:38AMपणजी : प्रतिनिधी

डी.एड शिक्षकांना  सरकारी नोकरी देण्याच्या आश्‍वासनाची  सरकारने त्वरित पूर्तता न केल्यास आंदोलन छेडू, असा इशारा डी.एड विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा गौरी जोशलकर यांनी पणजीतील आंबेडकर उद्यानात  घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

जोसलकर म्हणाल्या, डी.एड विद्यार्थ्यांसमोर रोजगाराची समस्या आहे. डी.एड शिक्षकांना सरकारी नोकरीत सामावून घ्यावे,अशी मागणी डिसेंबर 2017 मध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन करण्यात आली होती.त्यावेळी  त्यांनी डी.एड शिक्षकांसाठी 200 पदे भरण्यात येतील, असे आश्‍वासन  दिले होते. मात्र  अनेक महिने उलटले तरी अजूनही दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे  या विद्यार्थ्यांसमोर रोजगाराचा प्रश्‍न उपस्थित झाला असल्याचे त्यांनी म्हटले.  डी.एडच्या विद्यार्थ्यांचे प्रश्‍न मार्गी   लावण्यात सरकारला अपयश आले आहे. त्यातच सरकारकडून एका बाजूला  खासगी शाळांना परवानगी दिली जात असून  सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अनेक सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची टीकाही त्यांनी केली.

डी.एड विद्यार्थी संघटनेतर्फे   आपल्या मागण्यांसाठी यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  संघटनेचे सदस्य विठ्ठोबा नाईक, एकनाथ सावंत,रती गावकर यांच्यासह  सुमारे 60 डी.एड.  शिक्षक उपस्थित होते.