Thu, Jul 18, 2019 14:47होमपेज › Goa › काणकोणमधील बंधार्‍यांतील पाण्याच्या पातळीत घट

काणकोणमधील बंधार्‍यांतील पाण्याच्या पातळीत घट

Published On: Mar 06 2018 1:03AM | Last Updated: Mar 06 2018 1:03AMकाणकोण : प्रतिनिधी

काणकोण तालुक्यातील बहुतेक बंधार्‍यांमधील पाण्याची पातळी घटली असून एप्रिल, में महिन्यात येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यादृष्टीने पाणीपुरवठा खात्याने आतापासूनच नियोजनबद्ध आखणी करण्याची मागणी काणकोण पालिकेचे नगरसेवक दयानंद पागी यांनी केली आहे. गावणे धरणाचे काम पूर्ण झाले असून त्या जलाशयात असलेले पाणी एप्रिल आणि में महिन्यात टँकरद्वारे नागरिकांना पुरवण्याची मागणी अवे-खोतीगाव येथील नागरिक शांताराम देसाई यांनी केली आहे.                                                  

काणकोण तालुक्यातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सध्या 22 कोटी रुपये खर्चून दोन जलकुंभाची उभारणी तसेच समांतर जलवाहिनी  व मोटार पंप बसवण्याच्या कामाला कंत्राटदाराने सुरुवात केली आहे. पण हे काम संथगतीने करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर काणकोण तालुक्यातील पाण्याची समस्या सुटणार असल्याचे पाणी पुरवठा खात्याचे सहाय्यक अभियंते लेस्टर डिसोझा यांनी सांगितले. काणकोण तालुक्याला चापोली धरणातून पाण्याचा पुरवठा होतो. या धरणाचा जलाशय फक्त पावसाच्या पाण्याने भरतो. काणकोण तालुक्यात अनियमित पाणी पुरवठा होत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे जुन्या जलवाहिन्या आणि खंडित वीज पुरवठा आहे. चापोली धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता 38.75 आर.एल.आहे. मात्र यंदा जलाशय पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागला नसल्याने पाणी पुरवठा विभागाची यंदाच्या एप्रिल व मे महिन्यात सत्वपरीक्षा आहे.

यंदा फक्त 38.70 आर.एल जलसाठा आहे. अधफोंड येथील तळपण नदीच्या या डोहाच्या खालच्या पात्रात बंधारा बांधून डोहातील पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्यात येते. मात्र हा डोह एप्रिल महिन्यातच आटू लागतो. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात  पाणी पुरवठा विभागाला पाणी पुरवठा करणे अडचणीचे बनते. या दिवसांत पाणी पुरवठा एक दिवसाआड  केला जातो.तोही काही वेळापुरताच असतो. चापोली धरण व अधफोंड बंधार्‍यातील पाणी पाईपलाईन्समधून श्रीस्थळ येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडले जाते.

श्रीस्थळ येथे दहा व पाच एम.एल.डी. क्षमतेचे दोन स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत. काणकोण तालुक्याची दर दिवसाची पाण्याची गरज दहा एम.एल.डी आहे. मात्र पंधरा एम.एल.डी. जलशुद्धीकरण करण्याची क्षमता असूनही तालुक्याला अपुरा पाणी पुरवठा होत आहे. चापोली धरणातून पाणी खेचणारे पंप कमी क्षमतेचे आहेत. त्याचप्रमाणे धरण ते जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पाणी वाहून नेणारी पाईपलाईन कमी क्षमतेची आहे.  जास्त क्षमतेचे मोटार पंप तसेच जुन्या जलवाहिनीला लागून समांतर जलवाहिनी घालण्याचे काम कंत्राटदाराने सुरू केले आहे.