Mon, Apr 22, 2019 05:41होमपेज › Goa › गाण्याच्या मोडतोडीत सूर हरपला : पौडवाल

गाण्याच्या मोडतोडीत सूर हरपला : पौडवाल

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 8:21PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

सध्याची युवा पिढी पुर्वीच्या गाण्यांची मोडतोड करून नवीन काहीतरी करू पाहत आहे. गाण्यांची मोडतोड केल्यामुळे त्यातील सूर हरपला आहे. त्यामुळे कलेतील गोडवा कुठेतरी शोधावा लागत आहे. काही मुले अप्रतिम गातात, सध्या हरविलेला सूर ती परत आणतील,  अशी आशा पार्श्‍वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी  व्यक्त केली.

स्वस्तिक व कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित ‘हितगुज’ या कार्यक्रमात अनुराधा पौडवाल बोलत होत्या.  प्रा. संगीता अभ्यंकर यांनी पौडवाल यांच्याशी   संवाद साधला. 

कोणत्याही क्षेत्राला ठराविक अशी मर्यादा नसते. आपणाला कोणते शिखर गाठायचे आहे हे आपण ठरवायचे असते.  ज्यावेळी एखादी गोष्ट करून मनाला समाधान मिळेल त्यावेळी समजावे की आपण शिखर गाठले आहे असे मत  पौडवाल यांनी व्यक्त केले. 

पौडवाल म्हणाल्या, की लता मंगेशकर यांना आपण आपले दैवत मानते. लहानपणी आपला आवाज फार घोगरा होता. चौथीत असताना  लतादिदींचा  आवाज त्यांच्या पुढ्यात बसून ऐकण्याची संधी मिळाली. त्यावेळी जगात ‘आवाज’ या शब्दाचा अर्थ लतादिदींच्या गाण्यात आहे, असे वाटले. त्यानंतर काही दिवसांनीच आपल्याला  न्युमोनिया झाला. या काळात लतादिदींच्या आवाजाचा ध्यासच जडला होता व दिवसभर तोच ऐकत बसायचे.  न्युमोनियातून बरे होईपर्यंत लतादिदींच्या आवाजाचा ध्यास इतका जडला होता, की  मला  आपला आवाजच बदलण्याची जाणीव झाली. एका गोष्टींचा आपण ध्यास धरला आणि अनुभूती येईपर्यंत प्रयत्न चालू  ठेवला, असे  पौडवाल यांनी सांगितले. 

आपण गायनाच्या क्षेत्रात येणं म्हणजे निव्वळ नशीबाचा खेळ आहे. आपल्या कुटुंबाकडून आपल्याला मिळालेले सहकार्य फार अनमोल आहे. ‘आपल्या बाळाला आपणच घडवू शकते, त्याला दुसरी आई मिळणार नाही’ ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी. महिलांमध्ये सहनशक्ती फार असते त्याचबरोबर समाज घडविण्याचीही ताकद असते. शेफ म्हणून करिअर निवडले असते. गायना व्यतिरिक्त केक सजविण्याची आवड असल्याचेही पौडवाल यांनी सांगितले.