Sat, Jul 20, 2019 23:35होमपेज › Goa › धारगळ येथे रवींद्र भवन उभारणार 

धारगळ येथे रवींद्र भवन उभारणार 

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 22 2018 12:19AMपेडणे : प्रतिनिधी 

स्व. दत्ताराम काणेकर यांची पेडणे तालुक्यात रवींद्र भवन व्हावे अशी इच्छा होती. आपल्याजवळ त्यांनी वारंवार मागणी केली होती. पेडणे तालुक्यातील रवींद्र भवन धारगळ येथे उभारण्यात येणार आहे. एका महिन्यात रवींद्र भवनच्या बांधकामाला  सुरवात होईल.  रवींद्र भवनाच्या रुपाने दत्ताराम काणेकरांची इच्छा पूर्ण करणार, अशी ग्वाही पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी  दिली.

कला संस्कृती खाते ,सतीयादेवी केदार नाट्य मंडळ आणि श्री स्वामी न्यास पेडणे यांनी दि. 19 रोजी पेडणे न्हायबाग येथे आयोजित केलेल्या स्व. दत्ताराम काणेकर नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री आजगावकर बोलत होते. व्यासपीठावर  कला संस्कृती खात्याचे सहायक संचालक मिलिंद माटे, पंचायत सदस्य राकेश स्वार, राजेंद्र हळदणकर, नगरसेवक गजानन सावळ देसाई, जयेंद्रनाथ हळदणकर, कार्याध्यक्ष राजमोहन  शेट्ये, शशिकांत पुनाजी, साईदास स्वार, पुंडलिक पिळर्णकर उपस्थित होते .

मंत्री आजगावकर म्हणाले, की दत्ताराम  काणेकर यांनी आपली पत्रकारिता सत्याच्या बाजूने ठेवली, कधी कुणावर अन्याय केला  नाही. त्यांनी आपली लेखणी समाज प्रबोधनासाठी वापरली. अशी पत्रकारिता समाजासाठी इतर पत्रकारांनी करावी. काणेकर यांनी पेडण्यात  सरकारी पातळीवर शिगमोत्सव साजरा केला. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे.  कलाकारांना स्वतंत्र व्यासपीठ लवकरच कला भवनांच्या रूपाने मिळेल.  पेडण्यात  होऊ घातलेल्या प्रकल्पाना नागरिकांनी सहकार्य करावे.

सम्राज्ञी मराठे, किरण नाईक, सतीश गावस, मोहन देशप्रभू, शशिकांत पुनाजी, मयुरेश वस्त, तुलसीदास नाईक, राजू  शिंदे, मिनिन,   पेडणेकर, अनंत नाईक, महानंदा कोठावळे व उमेश गाड यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. जयराम रेडकर व तुकाराम हरमलकर यांनी भाषणे केली. शशिकांत पुनाजी यांनी स्वागत  केले. चंद्रकांत सांगळे यांनी  सूत्रसंचालन केले. शशिकांत पुनाजी यांनी आभार मानले.

 

Tags : goa, goa news, Dattaram Kaankar, Natya Mahotsav,