Mon, Mar 25, 2019 17:29होमपेज › Goa › वास्कोत कार्निव्हलचा जल्‍लोष!

वास्कोत कार्निव्हलचा जल्‍लोष!

Published On: Feb 13 2018 2:40AM | Last Updated: Feb 13 2018 2:06AMदाबोळी : प्रतिनिधी

‘खा, प्या मजा करा’, असा संदेश देऊन गोव्याच्या प्रमुख शहरांमध्ये फिरणार्‍या किंग मोमोचे वास्को शहरामध्ये नागरिकांनी भव्य स्वागत केले. गोवा पर्यटन खाते आणि वास्को कार्निव्हल समितीने आयोजित केलेली कार्निव्हल मिरवणूक सोमवारी वास्को शहरामध्ये मोठ्या जल्लोषात  झाली. संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास सेंट अ‍ॅन्ड्रू चर्च परिसरात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्यायाधीश न्या. शांतनू लेमकर व त्यांच्या पत्नी मोहिनी लेमकर यांनी बावटा दाखवून मिरवणुकीला सुरवात केली. त्यानंतर स्वातंत्र्य पथ मार्गाने पुढे होत दामोदर मंदिराकडून पुढे गेल्यानंतर रेल्वे स्थानकासमोर असलेल्या जोशी चौकामध्ये सांगता झाली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांनी हात उंचावून स्पर्धकांचे स्वागत केले.

यंदाच्या स्पर्धेमध्ये कौटुंबिक विभागात 9, जंक कार 6, पारंपरिक गट 13, पुरस्कृत गट 3, क्‍लावन व विदूषक गट 23 तसेच क्‍लब व संस्था गटातून 7 पथके सहभागी झाली होती. व्यासपीठावर न्या. लेमकर,  मोहिनी लेमकर, आमदार कार्लुस आल्मेदा, नगराध्यक्ष दीपक नाईक, नगरसेवक व समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सांगितले की, मुरगाव हिंदू समाजातर्फे देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेऊन पुढच्या वर्षापासून सरकारी पातळीवर साजरा करण्यात येणारा वास्को शहरातील कार्निव्हल व शिमगो मिरवणूक एल. एल. गोम्स मार्गाने होणार, असे जाहीर केले.