पणजी : प्रतिनिधी
राज्यातील डी.एड्. शिक्षक गेल्या कित्येक वर्षांपासून सरकारी नोकरी मिळेल याची अजून वाट पाहत आहेत. दरवेळी सरकारकडून रिक्त पदे भरली जातील, असे आश्वासन दिले जाते. सरकारने पुढील सात दिवसांत ठोस उत्तर दिले नाही तर 28 मे रोजी पर्वरीत विधानसभा संकुलात आंदोलन करणार, असा इशारा डी.एड्. विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा गौरी जोसलकर यांनी पणजी येथील आंबेडकर उद्यानात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
जोसलकर म्हणाल्या, की डी.एड्.च्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास सरकारला अपयश आले आहे. राज्यात डी.एड्. केलेले सुमारे अडीचशे विद्यार्थी असून त्यांना नोकरीची गरज आहे. डी.एड्.ची 2012 साली पदे भरण्यात आली होती. ती आरक्षित असल्याने याचा डी.एड.च्या विद्यार्थ्यांना काही फायदा झाला नाही. त्यानंतर आजवर एकही सरकारी पद भरण्यात आलेले नाही.
संघटनेच्या सदस्या सोनल नावेलकर म्हणाल्या, की सरकारने डी.एड्.विद्यार्थ्यांच्या नोकर्या कोणाला दिल्या आहेत, या संदर्भात माहिती मिळविण्यासाठी 15 डिसेंबर 2017 रोजी आरटीआय अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर आम्हाला मिळाले आहे. सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावे.
डी.एड् विद्यार्थ्यांची पदे बी.एड् विद्यार्थ्यांना दिली आहेत. डी.एड् विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी डिसेंबर 2017 मध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नोकर्या देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.डी.एड् विद्यार्थी संघटनेचे सर्व तालुका प्रमुख यावेळी उपस्थित होते.