Sat, Jul 20, 2019 10:50होमपेज › Goa › मराठी भाषेमुळेच संस्कृती अबाधित 

मराठी भाषेमुळेच संस्कृती अबाधित 

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 12:09AMवाळपई ः प्रतिनिधी

गावांमधील मराठी प्राथमिक शाळा टिकवून ठेवणे आज काळाची गरज बनली आहे. मराठी भाषेमुळेच गोमंतकातील संस्कृती अबाधित असल्याचे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी गुळेली सत्तरी येथे केले.

सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात गोवा मराठी अकादमी सत्तरी प्रभाग व गुळेली आणि पैकुळ शाळा समूह आयोजित पालक प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख वक्‍तेम्हणून सामंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गुळेली ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितेश गावडे, गुळेलीचे पंचायत सदस्य अनिल गावडे, धडा पंचायत सदस्य विठ्ठल कासकर, मराठी अकादमी सत्तरी प्रभाग अध्यक्ष नरहरी हळदणकर, उपाध्यक्ष प्रकाश गाडगीळ, सचिव विजय नाईक, सत्तरी समन्वयक आनंद मयेकर, सदस्य प्रेमानंद नाईक, गुळेली विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक दिलीप पालेकर, पैकुळ शाळा समूह अध्यक्ष काशी नाईक  उपस्थित होत्या.

सामंत पुढे म्हणाले की, प्राथमिक स्तरावर मराठी भाषा शिकल्यास पुढे इतर भाषा व्यवस्थितपणे शिकण्यास मदत होते. जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर हे मराठीतच शिकले होते. मराठीमुळे आपली नाळ आपल्या संस्कृतीशी जोडली गेली आहे. काही पालक आपल्या पाल्यांना प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून देतात. त्यामुळे मराठी भाषिक असूनही पुढे मातृभाषा बोलण्यात ते अडखळतात. परंतु, मराठीतून शिक्षण घेतलेल्या मुलांना पुढे इतर भाषा शिकण्यास अडथळे येत नाही. मराठीबरोबर इतरही भाषा शिकणे गैर नाही. शहरातील पालकांचा ओढा आता मराठीकडे वळत असून शहरात अनेकांना चांगल्या मराठी शाळांत प्रवेश मिळत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यासाठी ग्रामीण शाळासुद्धा तेवढ्याच दर्जेदार बनण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सामंत म्हणाले.

सत्तरी प्रभाग अध्यक्ष नरहरी हळदणकर म्हणाले की, पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी शाळांतच पाठवावे. गावांमधील मराठी शाळा टिकून राहणे आवश्यक आहे. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मराठी अकादमी सत्तरी प्रभाग याकामी सहकार्य करेल, असेही ते म्हणाले. सत्तरी समन्वयक आनंद मयेकर म्हणाले की, जगातील कुठलाच देश आपल्या मातृभाषेला डावलत नाही. प्रत्येक देशात मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले जाते. मराठी ही समृद्ध भाषा असून आपल्या गोव्याला मराठीचा वारसा आहे. त्यासाठी गावांतील प्राथमिक शाळा बंद पडता कामा नयेत, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत.

सर्वप्रथम सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी प्राथमिक शिक्षकांनी प्रार्थना सादर केली. प्रदिप ओपकर, गोकुळदास पिळर्णकर, महादेव गावकर, अजय गावडे, रोशन पारकर, सुनंदा जोशी, कल्पना परब, मिलन गोसावी, विश्‍वास मराठे आदी प्राथमिक शिक्षकांनी पुष्प देऊन मान्य वरांचे स्वागत केले. प्रास्ताविक आनंद मयेकर यांनी केले. तसेच विजय नाईक, धाकटू नाईक, शाम सांगोडकर यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन काशी नाईक यांनी केले. तर सुनंदा जोशी यांनी आभार मानले.

Tags : marathi, marathi language, goa