Wed, Jan 23, 2019 19:26होमपेज › Goa › सराईत गुन्हेगार चिमाचे हॉस्पिसियोतून पलायन

सराईत गुन्हेगार चिमाचे हॉस्पिसियोतून पलायन

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 05 2018 1:28AMमडगाव :  प्रतिनिधी

अटकेत असलेला सराईत गुन्हेगार पॉल चिमा (वय 20, नेपाळ) हॉस्पिसियो इस्पितळात उपचारासाठी  दाखल असताना शुक्रवारच्या मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास मडगाव पोलिसांना चकवून पलायन केले. या प्रकरणी चिमाविरुद्ध फातोर्डा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितावर पाळत ठेवण्यासाठी तैनात असलेले मडगाव पोलिस स्थानकाचे पोलिस कॉन्स्टेबल संजय वेळीप, रक्षित देवीदास आणि हिरेश बुधवाडकर यांना निलंबित करण्यात आले आहे.  चिमा याच्यावर घरफोडी, दुचाकी चोरी आदी अनेक प्रकरणी अनेक पोलिस स्थानकांत गुन्हे नोंद आहेत.  मडगाव पोलिसांनी बुधवार दि. 1  ऑगस्ट रोजी संशयित चिमा याला पकडले होते, त्यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. 

संशयित चिमाच्या हाताला जखम  झाली असल्याने त्याला हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री पोलिसांचे लक्ष नसल्याची संधी साधून रात्री 1 वाजण्याच्या सुमारास तो इस्पितळातून पळाला. पलायन केल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. चिमा हा पूर्वी वास्को येथे राहत होता. दोन वर्षांपासून तो आपल्या भाऊ आणि आईसोबत जाकनीबांद येथे  रहात होता. सदर प्रकरण मडगाव पोलिस स्थानकाच्या कक्षेत असले तरी हॉस्पिसियो इस्पितळ फातोर्डा पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने त्यांनी संशयितावर गुन्हा नोंदवला आहे.