Thu, Apr 25, 2019 04:14होमपेज › Goa › म्हापशात आई, मुलाचा दुर्दैवी अंत 

म्हापशात आई, मुलाचा दुर्दैवी अंत 

Published On: Aug 03 2018 1:34AM | Last Updated: Aug 03 2018 12:58AMम्हापसा : प्रतिनिधी

म्हापसा कदंबा बसस्थानक समोरील हॉटेल ब्रागांझासमोर गुरुवारी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास क्रेनने अ‍ॅक्टिव्हा दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात क्रेनच्या चाकाखाली सापडून साळगाव मालेभाट येथील सीमा अनिल पेडणेकर (वय 37) व सिद्धार्थ अनिल पेडणेकर (5) हे मायलेक जागीच ठार झाले. दुचाकीवरून उडून पडल्याने सीमा हिचे सासरे भानुदास पेडणेकर हे जखमी झाले. या प्रकरणी क्रेनचालक अब्दुल सुभार (31, रा. बिहार) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार   जीए 03 आर 1098 या क्रेनने अ‍ॅक्टिव्हा (जीए 03 एके 7920) दुचाकीला मागील बाजूने जोरदार धडक दिली. अ‍ॅक्टिव्हा चालक भानुदास पेडणेकर हे ब्रागांझा हॉटेलच्या पदपथावर  उडून पडले तर सीमा व सिद्धार्थ हे क्रेनच्या चाकाखाली सापडले. हा अपघात इतका भीषण होता की, सदर क्रेनने त्यांना सुमारे 10 मीटर  फरफटत नेले. अपघातानंतर क्रेन चालकाने  घटनास्थळावरून  पळ काढण्याचा प्रयत्न केला. हनुमान नाट्यगृहाजवळ   स्थानिकांनी त्याला अडविले व पोलिसांच्या स्वाधीन केले. सीमा पेडणेकर मुलासह साळगावहून सासरे भानुदास पेडणेकर यांच्या दुचाकीवरून म्हापशात डॉक्टरांना भेटण्यासाठी आल्या होत्या. यावेळी हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच म्हापसा पोलिस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने 108 रुग्णवाहिकाही घटनास्थळी आली. या 108 मधून भानुदास पेडणेकर यांना जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेले. तर पोलिसांच्या शववाहिकेतून दोघांचे मृतदेह बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात शवचिकित्सा करण्यासाठी पाठविण्यात आले.

क्रेन चालक अब्दूल सुभार याला पोलिसांनी भा.दं.स. 304 खाली गुन्हा नोंदवून अटक केली आहे. घटनेचा पंचनामा हवालदार महेश शेटगावकर यांनी केला. तर पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅलीडीयो फर्नांडिस करीत आहेत.