होमपेज › Goa › महापौर निवडणुकीसाठी भाजपकडून  राऊत-देसाई, डिक्रुज यांची नावे चर्चेत

महापौर निवडणुकीसाठी भाजपकडून  राऊत-देसाई, डिक्रुज यांची नावे चर्चेत

Published On: Mar 10 2018 2:15AM | Last Updated: Mar 10 2018 2:13AMपणजी : प्रतिनिधी

पणजी महानगरपालिकेच्या (मनपा) महापौर पदासाठी   विरोधी गट असलेल्या भाजपकडून नगरसेवक पुंडलिक राऊत-देसाई व मिनीन डिक्रुज यांची नावे स्पर्धेत पुढे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, अद्यापही या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही.  मनपा महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बुधवार, दि. 14 मार्च रोजी होणार आहे. या संदर्भातील अधिसूचना 6 मार्च रोजी जारी करण्यात आली आहे. मनपावर सध्या  गोवा फॉरवर्डच्या बाबूश मोन्सेरात गटाचे वर्चस्व आहे. सरकारमध्ये गोवा फॉरवर्ड व भाजपची युती असल्याने मनपातदेखील या दोन्ही पक्षांची युती असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापौर भाजपचा तर उपमहापौर गोवा फॉरवर्डचा असेल, असे म्हटले जात आहे. मात्र, मोन्सेरात यांनी यास नकार देत महापौरपदासाठी  स्वतंत्रपणे उमेदवार उभा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

भाजपकडून महापौर उमेदवाराच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले  नसले तरी देसाई व डिक्रुज यांची नावे पुढे आली. मनपा बैठकींमध्येदेखील अनेकदा हे दोघेही  विविध विषयांवरून   विद्यमान महापौर सुरेंद्र फुर्तादो यांना घेरताना दिसून येतात. तर मोन्सेरात गटाने अस्मिता केरकर यांचे नाव उपमहापौरपदासाठी निश्‍चित  केले आहे.