Sun, Jul 21, 2019 02:16होमपेज › Goa › सोपो कंत्राटावरून मडगाव पालिकेत वादावादी

सोपो कंत्राटावरून मडगाव पालिकेत वादावादी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मडगाव : प्रतिनिधी

मडगाव नगरपालिकेची सोपो लिलावाच्या कंत्राटदाराला एक महिन्याचा अवधी वाढवून देण्याच्या मुद्यावरून आयोजित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत आमदार दिगंबर कामत गट आणि सत्ताधारी मंत्री विजय सरदेसाई गट यांच्यात बरीच वादावादी झाली, शेवटी नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई यांना मतदान घेऊन विद्यमान कंत्राटदाराला सोपो वसुलीसाठी एक महिन्याचा अवधी वाढवून देण्याचा ठराव संमत करावा लागला.

लिलावाच्या कंत्राटाचा अवधी 31 मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. अद्याप नवीन कंत्राटदार नियुक्‍त करण्यात न आल्याने विद्यमान कंत्राटदाराला एका महिन्याचा अवधी वाढवून देण्याचा ठराव संमत करण्यासाठी पालिका मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. नगराध्यक्षा बबिता आंगले प्रभुदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. विद्यमान कंत्राटदाराला अवधी वाढवून द्यायचा की नाही, यावर चर्चा करण्याचा प्रस्ताव नगराध्यक्षा आंगले यांनी चर्चेला आणला असता नगरसेविका डोरिस टेक्सेरा, मनोज मसुरकर, आर्थर डिसिल्वा, राजू शिरोडकर यांनी तीव्र आक्षेप घेतला.

डिसिल्वा यांनी मुदत वाढवून देण्याच्या प्रस्तावाला विरोध करताना सांगितले, की हा काजू आणि आंब्याचा हंगाम आहे. पालिकेला उत्पन्न मिळण्याच्या वेळी तुम्ही कंत्राटदाराला फायदा करून देतात, असा आरोप त्यांनी केला. सोपो वसुलीचे काम पालिकेचा कर्मचारी करू शकत नाही काय, असा प्रश्‍न त्यांनी केला. यावर नगराध्यक्षा बबिता आंगले यांनी पालिकेचा कर्मचारी या कामासाठी सक्षम नसल्याचे सांगितले. शिवाय पालिका कर्मचार्‍यांना इतर कामे असल्याने त्यांच्याकडून सोपो वसुली होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डोरिस यांनी आक्षेप घेताना कंत्राटदाराला मुदत वाढवून दिल्याने पालिकेला त्याचा कोणताच फायदा होणार नाही, असे सांगितल्यानंतर याच विषयावरून डोरिस व आंगले यांची चांगली जुंपली. मुख्याधिकारी या विषयावर काहीच भाष्य करीत नसल्याची टीका नगरसेवक मनोज मसुरकर यांनी केली असता ही बैठक आपण बोलावली आहे, आपल्या आदेशाशिवाय ते बोलूच शकत नाही,  हे तुम्हाला माहिती असायला हवे, असे बबिता आंगले यांनी सुनावले. या विषयावर एकमत होत नसल्याने शेवटी नगराध्यक्षा आंगले यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतला. कंत्राटदाराला एका महिन्याचा अवधी देण्यात यावा की नाही यावर आंगले यांनी नागरसेवकांचे मतदान घेण्याचा निर्णय घेतला असता बहुसंख्य नगरसेवकांनी अवधी वाढवून देण्याच्या बाजूने हात वर करून मतदान केले आणि प्रस्ताव संमत झाला.

आंगले यांनी विरोधी गटाच्या नगरसेवकांचा मुद्दा मान्य करताना या एका महिन्यासाठी कंत्राटदाराकडून 25 टक्के जास्त उत्पन्न वसूल करून घेण्याचे मान्य केले. लवकरच त्या कंत्राटदाराला पत्र लिहून या विषयी कळविले जाईल, असे आंगले यांनी स्पष्ट केले. या वादात भाजप समर्थक नगरसेवकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.

मुख्याधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांनी सांगितले, की नॅशनल सेक्युरिटी ब्युरो यांची सुरक्षारक्षक पुरविण्यासाठी नियुक्‍ती करण्यात येणार आहे. पूर्वीच्या एजन्सीला साडेतीन लाख रुपये जात होते. या नवीन एजन्सीने सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या कामासाठी आपल्या इच्छा प्रस्तावात केवळ दोन लाख रुपयांची मागणी केल्याने हे कंत्राट नॅशनल सेक्युरिटी ब्युरो यांना दिले जावे, या प्रस्तावाला सर्व नगरसेवकांनी मान्यता दिली. 

नगरसेवक आर्थर डिसिल्वा यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्याधिकारी फर्नांडिस म्हणाले, मडगावात एकूण बावीस ठिकाणी सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत.जुन्या बस स्थानकावर जी सुडाच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती मुख्याधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांनी दिली. जुने बसस्थानक स्थलांतरित केले जाणार नाही. तसेच या ठिकणी वेंडिंग झोन निर्माण केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


  •