Sun, Jul 21, 2019 07:52होमपेज › Goa › कंत्राटी, सामूहिक शेतीसाठी नियमावलीचे काम हाती

कंत्राटी, सामूहिक शेतीसाठी नियमावलीचे काम हाती

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 30 2017 12:16AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

राज्य सरकारने कंत्राटी व सामुहिक शेतीच्या प्रकल्पांसाठी नियमावली तयार करण्याचे काम सध्या हाती घेतले आहे. सामुहिक शेतीसाठी सरकार प्रयत्नशील असून, या प्रकल्पासाठी नियम तयार केले जात असल्याची माहिती कृषी संचालक नेल्सन फिगेरेदो यांनी दिली.

फिगेरेदो म्हणाले, कृषी संघटनांच्या माध्यमातून जास्तीतजास्त शेतीचा विकास होईल, या दृष्टीने प्रयत्न केले जातील. ज्या कृषी संघटनेमध्ये अधिक सदस्य आहेत, त्यांना कृषी विषयक माहिती दिली जाईल. एकत्रित पध्दतीने शेती करून कृषी उत्पन्न वाढवू शकतील. अत्याधुनिक कृषी यंत्रांचा एकत्रित वापर करून व हंगामाप्रमाणे विविध पिके घेऊन मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्राचा विकास संघटना करू शकतील.

कंत्राटी शेतीची अंमलबजावणी करायची असल्यास सरकारला गोवा कृषी टेनन्सी अ‍ॅक्टमध्ये (कूळ कायदा) बदल करावा लागणार आहे. कंत्राटी पद्धतीच्या शेतीसाठी सरकारची मान्यता मिळाली असून, यासाठी गोवा टेनन्सी अ‍ॅक्टमध्ये काही दुरुस्ती शक्य असल्याचे नेल्सन फिगेरेदो यांनी सांगितले.

एखाद्या व्यक्तीने आपली जमीन दुसर्‍याला शेतीसाठी दिल्यास, जो शेती करणारा आहे, तो मुंडकार कायद्यानुसार त्या जमिनीवर आपला अधिकार सांगू शकतो, अशी भीती जमीन मालक व शेतकर्‍यांमध्ये आहे. कंत्राटी शेती पद्धतीमधील नियमानुसार, जमीन मालकांना याबाबत भीती व्यक्त करण्याची गरज नसेल. निर्धारित काळासाठी एक कंत्राट पद्धत असल्यामुळे जमीन कसणार्‍यांचा पिकांवर हक्क असेल, पण जमिनीवर नाही. कंत्राटी शेती करणार्‍याने शेतात जर विहीर खणली किंवा पाण्याची अन्य पद्धतीने सोय केली असेल, तर त्याला काही प्रमाणात संबंधित जमीन मालकाकडून भरपाई मिळेल, असे मुद्दे कंत्राटी शेतीच्या नियमावलीत येणार असल्याचेही फिगेरेदो यांनी सांगितले.