Thu, Jun 20, 2019 20:40होमपेज › Goa › खाणी १६ मार्चनंतरही सुरूच ठेवा 

खाणी १६ मार्चनंतरही सुरूच ठेवा 

Published On: Feb 22 2018 1:39AM | Last Updated: Feb 22 2018 1:39AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाणी 16  मार्चनंतरही  सुरूच ठेवाव्यात, या मागणीसाठी खाण अवलंबितांनी ‘पोटासाठी शेवटची हाक’ असा नारा देऊन आझाद मैदानावर बुधवारी जाहीर सभेद्वारे सरकारचे लक्ष वेधले. या सभेला सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसच्या एकूण 8 आमदारांनी तसेच खासदार नरेंद्र सावईकर यांनी  उपस्थित राहून  खाण अवलंबितांच्या मागणीला पाठिंबा दिला. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्यातील 88 खाणी 15 मार्चपासून बंद होणार असल्याने  खाण व्यवसायावर अवलंबून असलेले ट्रक, बार्ज व अन्य यंत्रणा मालक तथा चालक, कामगारांच्या रोजगाराचा यक्षप्रश्‍न  निर्माण झाला आहे. त्यामुळे खाण  कामगारांसह या व्यवसायाशी निगडित लोकांनी बुधवारी येथील आझाद मैदानावर ‘पोटासाठी शेवटची हाक’असा नारा  देऊन निदर्शने केली. यावेळी गोवा बार्जमालक संघटना, धारबांदोडा तालुका ट्रक मालक संघटना, अखिल गोवा यंत्र मालक संघटनांचे सदस्य तसेच खाणव्याप्त भागातील सरपंच, पंचायत सदस्य  मिळून सुमारे दीड हजार लोक   या सभेला उपस्थित होते. 

आझाद मैदानावर  सकाळी 9 वाजल्यापासून लोक जमू लागले  होते.  सरकारच्या घटक पक्षातील आमदार राजेश पाटणेकर, दीपक पाऊसकर आणि प्रसाद गावकर  यांनी दुपारी खाण अवलंबितांसोबत मैदानावर बसून  पाठिंबा व्यक्‍त केला. यावेळी आंदोलकांनी सर्व चाळीसही आमदारांनी आझाद मैदानावर हजर राहून आपण लोकांसोबत असल्याचे दाखवून द्यावे     तसेच खाणी 15मार्च नंतर सुरूच राहणार असल्याचे आश्‍वासन द्यावे, अशी मागणी केली. यासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली. या मुदतीत सर्व आमदारांचा आंदोलकांना पाठिंबा न  लाभल्यास पर्वरी येथील विधानसभेवर मोर्चा नेण्याचे घोषित केले. यावेळी  आ. निलेश काब्राल यांनी आपण सर्व आमदारांना मैदानावर आणतो, असे सांगितले. 

अधिवेशनाच्या कामकाजात जेवणाची सुट्टी मिळाल्यानंतर आ. निलेश काब्राल, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, काँग्रेसचे आ. प्रतापसिंह राणे,  लुईझिन फालेरो, रवी नाईक आदींनी आझाद मैदानावर येऊन आंदोलकांना समजावले.

प्रतापसिंह राणे म्हणाले, की गोव्यात खाण आणि पर्यटन हे दोन मुख्य व्यवसाय आहेत. खाणीवर अनेक कुटुंबांची  उपजीविका अवलंबून  असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या गोमंतकीय कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे. अनेकांनी ट्रक, बार्ज व अन्य यंत्रणा दुरूस्त करण्यासाठी बॅकांकडून कर्ज काढले. खाण अवलंबितांना सर्व  आमदारांचा पाठिंबा आहे. 

आ. काब्राल म्हणाले, गोवा फाऊंडेशनचे अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे राज्यातील खनिज उत्खननाची मर्यादा 20 वरून 12 दशलक्ष टन करण्याची मागणी केली आहे. हा गंभीर विषय असून त्यात सरकारने तातडीने लक्ष घालून तोडगा काढण्याची गरज आहे. राज्यातील खाणी येत्या 16 मार्चपासून कायम सुरू ठेवणे गरजेचे आहे. 

आ. लुईझिन फालेरो म्हणाले, की गोवा राज्याचा विकास वेगाने होण्याऐवजी आज अधोगतीकडे चालला आहे.   बेकायदा  खाण व्यवसायाकडे राज्य सरकारने नेहमी दुर्लक्ष केल्याने आज राज्याची  स्थिती बिकट झाली आहे. विधानसभेची कामकाज समिती  वा  न्या. शहा आयोग अथवा सर्वोच्च न्यायालय असो, या सर्वांनी खाणीबाबत याआधीही इशारा दिला असताना त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. यामुळे आज 12 हजार ट्रक बंद पडले असून खाणींसह अन्य व्यवसायही संकटात  सापडले आहेत.