Wed, Jun 26, 2019 11:32होमपेज › Goa › कलाविश्‍व सतत बदलणारे : पटवर्धन

कलाविश्‍व सतत बदलणारे : पटवर्धन

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 12:16AMपणजी : प्रतिनिधी

कला ही  केवळ कलाकारांच्या भावनेवर आणि कल्पनाशक्‍तीवर अवलंबून राहण्याचे दिवस आता गेले आहेत. कला ही एखाद्या गॅलरीपुरती आणि संकुचित कॅनव्हासमध्ये बंदिस्त ठेवली जाऊ शकत नाही. विविध वस्तूंचा आणि कल्पनांचा वापर करूनही स्थापत्यरूपातही  कला आता प्रदर्शित केली जात आहे. कलेला आता फक्‍त कला म्हणून न पाहता ते आता सतत बदलत जाणारे विश्‍व बनले असल्याचे भारतीय समकालीन चित्रकार व क्ष-किरणतज्ज्ञ सुधीर पटवर्धन यांनी सांगितले. येथील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात डी. डी. कोसंबी विचार महोत्सवाच्या  समारोपाच्या व्याख्यानात पटवर्धन ‘आजची कला काय आहे’ या विषयावर बोलत होते. 

पटवर्धन म्हणाले की, ‘कला म्हणजे नेमके काय’ असा प्रश्‍न अनेकजण विचारत असतात. कलेबद्दल साधारणत: पाच विविध कल्पना आपल्या मनात आहेत.  ‘कलेसाठी कला’, ही संकल्पना  आजच्या आधुनिक जगात जुनाट आणि पुरातनवादी  झाली आहे. त्या काळी कलाकारांच्या मनातील भावना रंगछटांच्या स्वरूपात कॅनव्हासवर उमटण्यापुरती कला मर्यादित होती. मात्र, या कलेला राजकारण, समाज, माहिती, तत्व, नितीशास्त्र या विषयांचे बंधन नव्हते. एकवेळ या कलाकारांना आपल्या चित्रातून काय सांगायचे आहे, हे अन्य लोकांना समजतही नसे. मात्र, त्या कलाकाराला चित्र कशाही पद्धतीने मांडण्याचे स्वातंत्र्य दिले जात असून त्याविषयी अन्य कोणाचीही हरकत नसे. 

‘कला ही लोकांसाठी आहे’ या दुसर्‍या कल्पनेत भारताच्या स्वातंत्र्यानंतर गेल्या 60-65 वर्षांत कला क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले असून आधुनिक आणि समकालीन  विचारांनी परिपूर्ण कलेचे विविध प्रकार उदयास आले आहेत. या कलेत मानवी भावनांचा आणि लोकांच्या  चेहर्‍यांवरील विविध छटांचा कलाकारांकडून वापर  केला जात असे. अशा चित्रांत ‘मानव’ हा केंद्रबिंदू ठरत असून अशी चित्रे खूप लोकप्रिय झाली असल्याचे पटवर्धन म्हणाले. 

‘कला ही स्वातंत्र्य आहे’ या मध्यवर्ती विचारावर 80च्या शतकातील चित्रे अवलंबून असायची.  एखाद्या जागेचा आपल्या पद्धतीने वापर करून कला मांडण्याचे प्रकार त्याकाळात सुरू झाले. शब्दांना विणकामात गुंफणे, हृदयांच्या आकारांचे दगड, उष्टे अन्न टाकलेल्या पत्रावळ्या आदी विषय अनोख्या पद्धतीने मांडून अनेक कलाकारांनी चित्रकलेला स्टूडिओच्या व गॅलरीच्या बाहेर नेल्याचे पटवर्धन यांनी सांगितले. 

‘कला म्हणजे कल्पना’ या विषयावर काही कलाकारांनी केलेल्या अभिनव प्रयोगाने बघणारेही चकित झाले. स्वामी विवेकानंद यांचे 1893 सालचे प्रसिद्ध भाषण पायर्‍यांवर मांडणे, देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे भाषण भल्यामोठ्या आरशांवर कोरणे आदी कलेचे प्रकार विस्मयजनक असल्याचेही पटवर्धन यांनी नमूद केले. 

‘कला म्हणजे जनतेचा सहभाग’ या कल्पनेनेही काही चित्रकार भारावून गेले होते. कलेला कोणाचेही, मग स्वत: त्या चित्रकारांच्या विचाराचे आणि स्वातंत्र्याचेही बंधन नसावे, असा विचार मांडण्यात आला. मुंबईच्या व्हीटी स्टेशनवर भरगर्दीत चित्र साकारणे, निर्वासितांसमोर  तंबूच्या कापडावरच चित्र काढणे आदी प्रकार या गटात येतात. शिल्पा गुप्ता या कलाकार महिलेने तर तिने भव्य कॅनव्हासवर काढलेल्या चित्रात बदल करण्यासाठी बघ्यांच्या हातात ‘खोडरबर’ देऊन  वेगळेच चित्र निर्माण करण्याची कल्पना अनेकांना भावून गेली होती.  कलाकारांचे चित्र हे त्यांच्या मालकीचे नसून त्यावर जनतेचाही हक्क आहे, असा या कल्पनेमागचा अर्थ असल्याचे पटवर्धन यांनी नमूद केले.