होमपेज › Goa › मादक पेय प्राशन केल्याने दोन कैद्यांना उलट्या

मादक पेय प्राशन केल्याने दोन कैद्यांना उलट्या

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 15 2018 12:23AMम्हापसा : प्रतिनिधी 

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने त्यांच्या कोठडीतील इतर कैद्यांना भांगसारखे कैफ आणणारे पेय दुधात मिसळून प्यायला दिल्याने दोन कैद्यांना उलट्या सुरू झाल्या. त्यांना मंगळवारी रात्री बांबोळी येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना बुधवारी तुरुंगात पाठविण्यात आले.

या प्रकरणी तुरुंग अधिकार्‍यांनी दिलेल्या तक्रारीस अनुसरून म्हापसा पोलिसांनी अनिल भुई या कैद्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 328 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांच्या  माहितीनुसार तुरुंगातील कोठडी क्रमांक 3 मधील अनिल भुई या कैद्याने संध्याकाळी 7 च्या सुमारास दुधात कैफ आणणारे सफेद रंगाचेे पेय मिसऴून प्यायला दिले. ते पेय प्यायल्याने कैद्यांपैकी सुर्वेश उर्फ बाबू आरोलकर (31) व विनय गडेकर (25) यांना काही वेळाने उलट्या सुरू झाल्या.

हा प्रकार कारागृहातील अधिकार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर दोघांना त्वरित येथील जिल्हा इस्पितळात दाखल केले. बुधवारी दुपारी विनय गडेकर यास इस्पितळातून पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले.

दरम्यान, कारागृहातील एक तुरूंगरक्षक किरण नाईक यांनाही मंगळवारी रात्रीच जिल्हा इस्पितळात दाखल केले. परंतु त्यांना रक्‍तदाबाच्या विकारावरून इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे समजते.    

पेयाचा परिणाम झालेले दोन्ही कैदी मयडे येथे घडलेल्या  खुनी हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी आहेत. पोलिसांनी कैद्यांना पाजलेले पेय जप्त केले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कृष्णा गावस करीत आहेत.