होमपेज › Goa › 24 तास पाणीपुरवठ्यासाठी सल्लागार 

24 तास पाणीपुरवठ्यासाठी सल्लागार 

Published On: Jul 28 2018 1:32AM | Last Updated: Jul 28 2018 12:19AMपणजी : प्रतिनिधी 

गोव्यात 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने  मॅपिंग करण्यासाठी  सल्‍लागाराची नियुक्‍ती करण्यात आली आहे, असे सांगून जायका प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याचीही माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत शुक्रवारी  प्रश्‍नोत्तर तासात दिली.वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्स यांनी राज्यात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे, असा प्रश्‍न केला होता.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले,  राज्यात 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पांची क्षमता वाढवण्याबरोबरच अखंडीत वीजपुरवठादेखील आवश्यक आहे. यासाठी वीज स्टेशनमधून केबल्स आता जलशुद्धीकरण प्रकल्पांना जोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा करण्यामध्ये येणारी वीजपुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

सरकारकडून जलशुद्धीकरण प्रकल्पांची क्षमता 167 एमएलडीने वाढवली जाणार आहे. यात ओपा प्रकल्प 27 एमएलडी, म्हैसाळ प्रकल्प 10 एमएलडी, अस्नोडा प्रकल्प 30 एमएलडी, साळ 10 एमएलडी, पर्वरी व गिरी प्रकल्प प्रत्येकी 15 एमएलडी आदींचा समावेश आहे. त्याशिवाय  24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यासाठी   मॅपिंग करण्यासाठी सल्‍लागाराची नेमणूक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात जितकी पाण्याची मागणी आहे तितका त्याचा पुरवठा केला  जात आहे. ज्या ठिकाणी जुन्या  पाईपलाईन्स आहेत, त्यादेखील बदलण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.