Tue, Nov 20, 2018 06:18होमपेज › Goa › ‘मायनिंग कॉरिडोर’चे बांधकाम फेब्रुवारीपासून : दीपक पाऊसकर

‘मायनिंग कॉरिडोर’चे बांधकाम फेब्रुवारीपासून : दीपक पाऊसकर

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:31AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील ग्रामीण भागात खनिज वाहतूक करणार्‍या ट्रकांमुळे उद्भवणार्‍या समस्या दूर करण्यासाठी नव्या रस्त्यांचे जाळे विणणार्‍या ‘मायनिंग कॉरिडॉर’च्या कामाचा प्रारंभ येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे, असे साधन सुविधा विकास महामंडळाचे (जीएसआयडीसी) अध्यक्ष आमदार दीपक पाऊसकर यांनी गुरुवारी सांगितले. दक्षिण गोव्यात गुड्डेमळ ते कापशे या 100 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेतले जाणार आहे, असेही ते म्हणाले.

खनिजवाहू ट्रकांनी गावातील मुख्य रस्ते न वापरता त्यांच्यासाठी ‘मायनिंग कॉरिडॉर ’ म्हणून वेगळे रस्ते उभारण्याचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी 2011 साली मांडला होता. खाणपट्ट्यात मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी तसेच अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग  उभारण्याचे योजण्यात आले होते.

पाऊसकर म्हणाले की, ‘मायनिंग कॉरिडॉर’ च्या दुसर्‍या टप्प्यातील तिळामळ ते रिवण भागातील रस्त्यांचे काम तूर्त अडले आहे. या भागातील खाण लिजेस् पर्यावरणीय परवान्यांसाठी रखडल्या आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे मायनिंग कॉरिडॉरसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठक घेणार आहेत. ‘मायनिंग कॉरिडॉर’चे बांधकाम खाणमालकांकडून जमा केलेल्या जिल्हा खनिज निधीतून की राज्य किंवा केंद्र सरकारच्या निधीतून होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ट्रकांना मिळणार लाभ...

‘मायनिंग कॉरिडॉर’चा काही रस्ता हा रानातून जाणार असल्याने वन खात्याकडून या प्रकल्पासाठी लवकरच ‘ना हरकत’ दाखला दिला जाणार आहे. खाणींपासून जेटींपर्यंत खनिज वाहतूक करणार्‍या  ट्रकांना या मायनिंग कॉरिडॉरचा लाभ मिळणार आहे.