होमपेज › Goa › मासळी निर्यात बंदीचा विचार : विश्‍वजित राणे

मासळी निर्यात बंदीचा विचार : विश्‍वजित राणे

Published On: Jul 21 2018 1:34AM | Last Updated: Jul 21 2018 1:30AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील मच्छीमारांकडून उपलब्ध होणार्‍या मासळीची निर्यात   बंद करण्याचा विचार असून त्यामुळे ‘मासळीमध्ये फार्मेलिन’प्रश्‍नी कायमचा तोडगा निघेल, असा विश्‍वास आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी व्यक्‍त केला. परराज्यातून आयात होणार्‍या मासळीला राज्यात कायमची बंदी घालण्याबाबतही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.  राणे म्हणाले की, आम्ही गोव्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी निवडून आलो असून गोवेकरांचे जीवन सुसह्य करण्याचे आपले प्रयत्न  नेहमीच राहणार आहेत. ‘मासळीत फार्मेलिन’ आढळल्याच्या प्रकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून काही अनिष्ट प्रवृत्तीच्या लोकांमार्फत अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) लक्ष्य बनवले जात आहे. यामागे सहजतेने पैसा कमावणारे एजंट असूनत्यांचा डाव आपण यशस्वी होऊ देणार नाही. 

राज्य सरकारने मासळी आयातीवर पंधरा दिवसांची बंदी घातली असली तरी या कालावधीत मासळीच्या तपासणीचे काम एफडीएतर्फे सुरूच राहणार आहे. हा बंदीचा काळ संपल्यानंतर राज्यात  प्रवेश करणार्‍या मासेवाहू ट्रकांवर नजर ठेवली जाणार असून एफडीएचे प्रमाणपत्र या ट्रकांना बंधनकारक केले जाणार आहे. आपण मासळी आयात कायमची बंद करण्यासाठी आग्रही असून त्यासाठी सरकारच्या ज्येष्ठ नेत्यांचे मन वळविणार आहे. राज्यातील मच्छीमारांनी पकडलेले मत्स्यधन राज्यातील लोकांसाठीच राखून ठेवण्याची आपली इच्छा आहे. त्यातून या समस्येवर कायमचा तोडगा निघेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.