Fri, May 24, 2019 06:52होमपेज › Goa › काँग्रेस कार्यकर्त्यांचा वीज अभियंत्याला घेराव

काँग्रेस कार्यकर्त्यांचा वीज अभियंत्याला घेराव

Published On: Jun 05 2018 1:41AM | Last Updated: Jun 05 2018 1:38AMपणजी : प्रतिनिधी

पणजीत रविवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित झाल्याने संतापलेल्या प्रदेश काँग्रेसच्या तिसवाडी गट कार्यकर्त्यांनी सोमवारी मुख्य वीज अभियंता  एन. नीळकंठ रेड्डी यांना घेराव घालून जाब विचारला. या प्रकरणी  चौकशी करून आठ दिवसांत दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. घडल्या प्रकाराबाबत वीज अभियंत्यांना माफी मागण्यासही भाग पाडण्यात आले. दरम्यान, पणजी, ताळगाव, सांताक्रुझ, सांतआंद्रे भागात शनिवारी व रविवारी वीज पुरवठा खंडित राहिल्याने तेथील रहिवाशांनी रविवारी रात्री उशिरा कदंब पठारावरील वीज उपकेंद्राच्या अभियंत्यांना घेराओ घालून जाब विचारला.

कदंब पठारावरील एका बिल्डरच्या लाभासाठी उच्च दाबाची  वीज वाहिनी असणारा खांब अन्यत्र हलवण्याच्या वीज खात्याच्या  कामामुळे वीज पुरवठा खंडित केला गेल्याचा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला.

प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते अ‍ॅड. यतिश नाईक म्हणाले, कदंब पठारावरील एका बिल्डरकडून मोठा प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र सदर प्रकल्पाच्या जागेत हाय टेन्शन वीज खांब अडथळा ठरत होता. त्यामुळे वीज खात्याने बिल्डरचा हा अडथळा दूर करण्यासाठीच सदर हाय टेन्शन वीज खांब हलवण्याच्या नादात  पणजीकरांना  रविवारी  पूर्ण दिवस विजेविना ठेवले. वीज खात्याकडून जनतेला गृहीत धरले जात आहे. वीज खात्याकडून वीज  देखभालीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात आल्याचे खोटे सांगण्यात आले. प्रत्यक्षात हा सर्व खटाटोप केवळ बिल्डरसाठी करण्यात आला. वीज खात्याने यावर स्पष्टीकरण देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले.

नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो म्हणाले,  वीज  खात्याकडून   जनतेची सतावणूक केली जाते. खाते केवळ बिल्डर तसेच  उद्योजकांसाठी काम करतेे. पणजीत  वीज नसल्याने त्याचा इस्पितळांना देखील फटका बसला. एका बाजूने   पणजी शहर, कदंब पठार, जुने गोवेत वीज पुरवठा खंडित असतानाच केवळ वीज मंत्र्यांच्या   बंगल्यातच कसा वीज पुरवठा सुरळीत होता, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 
दरम्यान, गेल्या वर्षात विजेच्या व्यवस्थापनाचे काम झालेले नसल्याने गोव्यातील विविध भागात वीज समस्या  उद्भवत असल्याचे कारण या वेळी रेड्डी यांनी दिले. पणजी शहरातील वीज ही देखभालीच्या कामासाठी बंद करण्यात आली होती असेही त्यांनी सांगितले. मात्र, प्रदेश काँग्रेसकडून  करण्यात आलेल्या प्रश्‍नांच्या भडीमारावर   मुख्य वीज अभियंता निळकंठ रेड्डी यांना समाधानकारक उत्तर देणे जमले नाही.   काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अ‍ॅड यतीश नाईक, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, सिध्दनाथ बुयांव, संकल्प आमोणकर, जनार्दन भंडारी आदी यावेळी उपस्थित होते.