Mon, Apr 22, 2019 03:49होमपेज › Goa › स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण राज्यपालांनी करावे

स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण राज्यपालांनी करावे

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात ध्वजारोहणाचा हक्‍क अन्य एखाद्या मंत्र्याला देण्याची गरज आहे. घटनेनुसार सभापती सरकारचा भाग नसून ते तटस्थ पद आहे. यामुळे यंदाचे ध्वजारोहण राज्यपाल मृदुला सिन्हा यांनीच करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्‍ते संकल्प आमोणकर यांनी केली. 

येथील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमोणकर म्हणाले, मुख्यमंत्री पर्रीकर सात दिवसांच्या रजेवर गेले असून त्यांनी मागच्या वेळेप्रमाणे कोणत्याही मंत्र्याला तात्पुरता कारभार चालवण्याचा अधिकार दिलेला नाही. मात्र, स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्याचा आपला अधिकार सभापती प्रमोद सावंत यांना दिला ते चुकीचे आहे. देशभरात सर्व राज्यांत मुख्यमंत्री ध्वजारोहण करतात ही प्रथा आहे. सभापतींनी राज्य कारभारात तटस्थ राहण्याची आवश्यकता असून ते सरकारचे प्रतिनिधीत्व करू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सभापतींनी ध्वजारोहण केल्याने इतिहासात या नव्या पध्दतीची चुकीच्या कारणासाठी नोंद होईल.

राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची गरज आहे. शासकीय पद्धतीनुसार, देशभरात 1974 सालापासून मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिनी आणि राज्यपाल प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करतात. मात्र, सभापतींनी ध्वजारोहण करण्याचा हा इतिहासातला पहिला प्रसंग ठरणार आहे. सरकार म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ असून त्यात सभापतींना दखल देण्याचा घटनात्मक अधिकार नसल्याचे आमोणकर यांनी नमूद केेले.