Thu, Jun 20, 2019 01:48होमपेज › Goa › काँग्रेसचा नव्याने स्थगन प्रस्ताव

काँग्रेसचा नव्याने स्थगन प्रस्ताव

Published On: Jul 23 2018 1:07AM | Last Updated: Jul 22 2018 11:34PMपणजी : प्रतिनिधी

राज्यात परराज्यातून आयात होणार्‍या माशांमध्ये आरोग्याला धोकादायक ‘फार्मेलिन’चा वापर होत असल्याने, त्यावर सोमवारी अधिवेशनात चर्चा करण्यासाठी काँग्रेसकडून नव्याने स्थगन प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यामुळे, सोमवारी सतत तिसर्‍या दिवशीही सभागृहाचे कामकाज चालविण्यात अडथळे होण्याची शक्यता असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. 

पावसाळी अधिवेशनाच्या गुरूवार-शुक्रवार या पहिल्या दोन दिवशी मासळीतील फार्मेलिनचा विषय लावून धरत काँग्रेसने स्थगन प्रस्तावावरील चर्चेसाठी आग्रह धरून कामकाज रोखून ठेवले होते. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी या चर्चेला स्पष्ट नकार दर्शवत विधानसभा सभागृहाचे कामकाज गुरुवारी पाचवेळा तहकूब केले. त्यानंतर, शुक्रवारी प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी पुन्हा एकदा स्थगन प्रस्तावाचा विषय उपस्थित केला. या विषयाला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरूवारचा स्थगन प्रस्ताव शुक्रवारी घेता येत नसल्याचे सांगून हरकत  घेतली होती. विरोधी पक्षाकडून शुक्रवारी नवा स्थगन प्रस्ताव मांडलेला नसताना ही चर्चा कोणत्या नियमाखाली होईल, असा प्रश्न त्यांनी केला. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी लक्षवेधी सूचनेवेळी विरोधकांना या विषयावर बोलण्याची संधी होती ती त्यांनी गमावली असून आता त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले होते. तरी विरोधक सभागृहाच्या हौदात उतरल्याने अधिवेशन सोमवार सकाळी 11.30 पर्यंत तहकूब करण्यात आले होते. 

याविषयी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांना विचारले असता, ते म्हणाले की, लोकांच्या आरोग्याशी निगडीत अशा महत्वाच्या प्रश्‍नाबाबत सरकार गंभीर असेल तर, सोमवारी ‘फार्मेलिन’विषयावर चर्चा करू दिली जाईल, अशी अपेक्षा आहे. अधिवेशनाच्या समोरील सर्व प्रश्‍न मागे ठेवून याच विषयावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. मात्र केवळ तांत्रिक बाजू पुढे करून हा विषय टाळला जाणे हे दुर्दैवी आहे. 

‘फार्मेलिनवर चर्चेसाठी काँग्रेस आग्रही’

काँग्रेसच्या सर्व 16 ही आमदारांनी एकजुटीने अधिवेशनात माशांतील फार्मेलिन विषयावर आवाज उठवला आहे. मात्र, जनतेच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या ज्वलंत प्रश्‍नावर चर्चा होऊ नये यासाठी सभापती प्रमोद सावंत यांच्यावर भाजप दबाव आणत आहे. या प्रश्‍नी सोमवारीही चर्चा घडवून  आणण्याची मागणी काँग्रेस आमदार करणार असल्याचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले. 

काँग्रेसचा सुधारीत स्थगन प्रस्ताव 

सभापतींनी  तांत्रिक अडचण पुढे करून दोन दिवस  स्थगन प्रस्ताव नाकारल्याने काँग्रेसने आता सर्व बाबी लक्षात घेऊन नव्या स्थगन प्रस्तावाची विधानसभेच्या सचिवांना नोटीस दिली आहे.  या नोटिशीत, सोमवारी सकाळी अधिवेशनाच्या प्रश्‍नोत्तर तासाच्या आधी स्थगन प्रस्ताव घ्यावा, अशी दुरूस्ती केलेली ठरावाची नोटीस पाठवण्यात आली आहे. विधानसभेच्या  कामकाजाच्या कायद्याच्या कलम- 69 नुसार, जनतेच्या दृष्टीने महत्वाच्या आणि ज्वलंत प्रश्‍नावर सभागृहात चर्चा करता येते. यामुळे, सभापतींना सोमवारी स्थगन प्रस्तावावर सर्वात आधी आपला निर्णय घ्यावा लागणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सोमवारी याप्रश्‍नी सविस्तरपणे खुलासा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.