Tue, Jul 16, 2019 21:47होमपेज › Goa › काँग्रेस नेत्यांचा ‘मगो’शी सत्तांतरासाठी संपर्क नको : ढवळीकर 

काँग्रेस नेत्यांचा ‘मगो’शी सत्तांतरासाठी संपर्क नको : ढवळीकर 

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 04 2018 1:17AMपणजी : प्रतिनिधी

सध्याचे सरकार उलथवून नवे सरकार घडवण्याबाबत काँग्रेसकडून  मगो पक्षाच्या काही नेत्यांशी संपर्क साधला जात आहे. काँग्रेसने सत्तास्थापनेसाठीचे व सत्तांतराचे संकेत देणे त्वरित बंद करावे, असा सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिला.

ढवळीकर म्हणाले, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे कुणीही राजकारण करू नये. मुख्यमंत्रिपदाचा ताबा अन्य मंत्र्यांकडे द्यावा, अशी राजकीय विधानेही काँग्रेसने करू नयेत. 

मुख्यमंत्री पर्रीकर अनुपस्थित असल्याने राज्यातील प्रशासन कोलमडले असल्याची टीका  काँग्रेस नेते करीत आहेत. प्रशासन कोलमडलेले नाही. विविध सरकारी खात्यांचे सचिव, संचालकांकडे   अधिकार असून प्रशासन योग्यरीत्या चालविले जात आहे. मुख्यमंत्री पर्रीकर 8 सप्टेंबर रोजी राज्यात परत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकार स्थापनेसंदर्भात काँग्रेसचे आजी-माजी आमदार तसेच नेते मगोच्या काही नेत्यांकडे संपर्क साधत आहेत. काँग्रेस पक्षाचे 16 आमदार असून विधानसभेतदेखील ते एकत्र दिसत नाहीत. त्यामुळे काँग्रेसने अगोदर आपले घर सांभाळावे व त्यानंतर दुसरीकडे लक्ष द्यावे. आम्ही सरकार सांभाळण्यास सक्षम असल्याचेही ढवळीकर यांनी स्पष्ट केले.