Tue, Apr 23, 2019 19:59होमपेज › Goa › काँग्रेसकडून वीज अभियंत्यांना घेराव

काँग्रेसकडून वीज अभियंत्यांना घेराव

Published On: Jun 30 2018 1:15AM | Last Updated: Jun 30 2018 12:40AM
पणजी : प्रतिनिधी

वीज दरवाढीमुळे सामान्य जनता  त्रस्त झाली आहे.  त्यातच वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने त्यांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे. वीजदरवाढ व वीज  समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे, या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पणजीतील विद्युत भवनात जाऊन  मुख्य अभियंता रेड्डी यांना घेराव घातला. कुडतरीचे आमदार  आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व  तिसवाडी गटाध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नेऊन घेराव घालण्यात आला  होता. 

रेजिनाल्ड म्हणाले,  सरकारकडून वीज दरवाढ करण्यात आल्याने जनता त्रासली आहे.  वीज दरवाढीच्या मुद्द्यावर विधानसभेतदेखील चर्चा झाली होती. त्यावेळी सरकारने यात लक्ष घालण्याचे आश्‍वासन देऊन संयुक्‍त वीज नियमन मंडळाकडे (जेईआरसी) भूमिका मांडू, असे सांगितले होते. मात्र, अजूनही  सरकारने जेईआरसीकडे  सदर विषय पोहचलेला नाही. सरकारने आणखी वीज दरवाढ होऊ नये, यासाठी जेईआरसीकडे वीज दरवाढीला हरकत घ्यावी. सध्याचा वीज दर खूप असल्याने  तो कमी करावा, अशी मागणी वीज खात्याकडे करण्यात आली आहे.  सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलावे,अशी मागणीही  रेजिनाल्ड यांनी केली.

अमरनाथ पणजीकर म्हणाले, दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळातच सध्या लागू असलेली वीज दरवाढ  करण्यात आल्याचे खात्याकडून सांगण्यात येत आहे. ही बाब चुकीची आहे. लोकांना आज भरमसाट बिले येत आहेत. त्यांनी लोकांना विचारावे, की वीज बिले कधी अधिक यायची, आता की कामत सरकारच्या काळात. मुख्य वीज अभियंता ही जबाबदार व्यक्‍ती असल्याने त्यांनी अशी विधाने करू नयेत, असेही पणजीकर म्हणाले.