Thu, May 23, 2019 04:18होमपेज › Goa › राज्यात काँग्रेस,‘आयटक’ची निदर्शने  

राज्यात काँग्रेस,‘आयटक’ची निदर्शने  

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 11 2018 12:29AMपणजी : प्रतिनिधी

काँग्रेससह डाव्या पक्षांनी महागाई विरोधात पुकारलेला भारत बंद   सोमवारी राज्यात पाळण्यात आला नाही. सर्व व्यवहार सुरळीत राहिले.  मात्र,  काँग्रेस, आयटकतर्फे पणजीसह राज्यात  काही ठिकाणी  निदर्शने करून वाढत्या इंधनदराबरोबरच महागाई विरोधात संताप व्यक्‍त करण्यात आला. इंधनदर कपातीची मागणी करण्यात आली. इंधनदरासंदर्भात काँग्रेसतर्फे  पत्रके वाटण्यात आली.

महागाई, पेट्रोल व डिझेल  दरवाढीविरोधात विरोधी पक्ष काँग्रेस बरोबरच अन्य पक्षांनी देशव्यापी बंदची हाक दिली होती. मात्र, गणेश चतुर्थीनजीक आल्याने राज्यात बंद न पाळण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने  घेतला होता.  या बंदला केवळ पाठिंबा देण्याचे प्रदेश काँग्रेसने ठरवले होते.त्यानुसार उत्तर व दक्षिण गोव्यातील प्रमुख पेट्रोल पंपांवर काँग्रेसच्या राजवटीत असलेले इंधन दर आणि सध्या असलेले इंधन दर यातील तफावत दर्शवणार्‍या पत्रकांचे वाटप करून काँग्रेसतर्फे जनजागृती करण्यात आली. जीवनाश्यक वस्तूंचे वाढते दर, स्वयंपाकाच्या गॅसचे वाढते दर, पेट्रोल व डिझेलची होणारी नियमित दरवाढ या विरोधात संताप व्यक्त केला. 

‘आयटक’तर्फे पणजीत कदंब बसस्थानकावर  कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांच्या नेतृत्त्वाखाली निदर्शने करण्यात आली.  काँग्रेसतर्फे मडगावातील पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यास येणार्‍या वाहनधारकांमध्ये आमदार दिगंबर कामत यांच्या नेतृत्त्वाखाली जनजागृती करण्यात आली.

प्रदेश काँग्रेसतर्फे पणजीतील कंटक पेट्रोल पंप, हिरा पेट्रोल पंपावर या पत्रकांचे वाटप करण्यात आले. गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी ए. चेल्‍लाकुमार  यांच्या नेतृत्त्वाखाली हे शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. चेल्‍लाकुमार म्हणाले की, मागील काही महिन्यांत पेट्रोल, डिझेल, एलपीजी, कच्चे तेल, दूध, डाळ आदी विविध जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे.   वाढत्या महागाईवर मात्र तोडगा काढण्यास सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  शांततापूर्ण पध्दतीने आंदोलन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रातील भाजप सरकारने  इंधनावरील अबकारी करात 2014 सालापासून वाढ केल्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. अबकारी करात वाढ केल्याने आतापर्यंत भाजप सरकारने 11 लाख कोटी रुपये कमावले आहेत. सरकारने आता जनतेचा विचार करून पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजीचे दर त्वरित कमी करावेत. वाढत्या महागाई विरोधात गोमंतकीय जनतेनेदेखील आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले. ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, सांताक्रु्रझचे आमदार टोनी फर्नांडिस, पणजीचे माजी महापौर  सुरेंद्र फुर्तादो, यतिन पारेख, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते यतिश नाईक तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.