Sun, Nov 18, 2018 19:49होमपेज › Goa › ‘रेरा’मुळे बांधकाम प्रकल्पांची वेळेत पूर्तता

‘रेरा’मुळे बांधकाम प्रकल्पांची वेळेत पूर्तता

Published On: Aug 19 2018 1:30AM | Last Updated: Aug 19 2018 12:44AMपणजी : प्रतिनिधी

‘रेरा’ची अंमलबजावणी झाल्यापासून बांधकाम प्रकल्प वेळेत पूर्ण होत असून   बिल्डर व खरेदी करणार्‍यांमध्ये समतोल साधणारा  करार  होत असल्याचे  प्रतिपादन   मुख्य नगरनियोजक डॉ. डी.टी पुत्तुुराजू  यांनी  पणजी येथे आयोजित ‘रेरा’विषयक दोन दिवशीय  राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनावेळी केले.

इन्स्टिट्युशन ऑफ  इंजिनियर्स  इंडिया, ‘रेरा’ गोवा, गोवा सरकार व  क्रेडाय यांच्या संयुक्‍त विद्यमाने  या दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात  आले आहे. 

डॉ. पुत्तुराजू म्हणाले, ‘रेरा’मुळे बिल्डरांच्या ट्रॅक रेकॉर्डना चालना मिळण्यास मदत होत आहे. यामुळे  मालमत्ता खरेदी करणार्‍यांचे हित जपण्यासही मदत मिळते.   ‘रेरा’ कायद्याच्या अंमलबजावणीमुळे   रियल इस्टेट मध्ये  होणार्‍या गुंतवणुकीत वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.

क्रेडायचे   अध्यक्ष देश प्रभूदेसाई म्हणाले, ‘रेरा’मुळे   रियल इस्टेट क्षेत्रात  अधिक व्यावसायिकता आली आहे.‘रेरा’ मुळे वेळेत बांधकाम प्रकल्प  पूर्ण होण्याबरोबरच त्यांच्या  दर्जात देखील वाढ झाली आहे.   ‘रेरा’ संदर्भातील  परिसंवाद हा कौतुकास्पद  उपक्रम असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी  इन्स्टिट्युशन ऑफ  इंजिनियर्स  इंडियाचे  अध्यक्ष गुरुनाथ  नाईक पर्रीकर, सचिव  दीपक करमळकर, आयोजन  सचिव  चंद्रशेखर  प्रभूदेसाई व निमंत्रक दत्ता कारे  उपस्थित होते.