Wed, Apr 24, 2019 11:35होमपेज › Goa › महामार्ग, पुलांची कामे वेळेत पूर्ण करा

महामार्ग, पुलांची कामे वेळेत पूर्ण करा

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AMपणजी : प्रतिनिधी

राज्याच्या द‍ृष्टीने महत्त्वाच्या अशा महामार्ग तसेच पुलांसह विविध विकासकामांचा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत आढावा घेतला. राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य साधनसुविधा प्रकल्प निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकार्‍यांना दिले, अशी माहिती  सूत्रांनी दिली. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच जीएसआयडीसीच्या अधिकार्‍यांसमवेत मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी  रविवारी सुट्टीच्या दिवशीही सचिवालयात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना पाचारण केले. राज्याच्या द‍ृष्टीने महत्त्वाचे असे मांडवी नदीवरील तिसरा पूल, झुवारी पूल, बांबोळी ते पत्रादेवी महामार्ग, खांडेपार पूल, मिसिंग लिंक आणि तळपण- गालजीबाग पुलाच्या कामांबाबत अधिकार्‍यांशी चर्चा केली.   

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामांसंबंधी धारेवर धरले होते. या अधिवेशनात मंत्री सुदिन ढवळीकर आजारपणामुळे  गैरहजर राहिल्याने मुख्यमंत्री पर्रीकर यांनी खात्याचा अतिरिक्‍त भार सांभाळून विरोधकांना यशस्वीरीत्या तोंड दिले होते. आपल्यावर अन्य खात्यांची अतिरिक्‍त जबाबदारी पडल्याने अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेता आला नसल्याचे सांगितले होते. मात्र अधिवेशन संपल्यानंतर आपण खात्यांच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत निर्देश देणार असल्याचे उत्तर दिले होते. त्यानुसार पर्रीकर यांनी अधिवेशन संपल्यानंतर दोन  दिवसांत रविवारी  राज्यातील राष्ट्रीय  महामार्ग तसेच अन्य प्रकल्पांसंबंधी आढावा बैठक घेतली.

अधिवेशनात पर्रीकर यांनी आमदार रवी नाईक यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की, मांडवीवरील तिसर्‍या पुलाचे 87 टक्के काम पूर्ण झाले असून केवळ 13 टक्के काम राहिले आहे. उर्वरीत काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. पर्रीकर यांनी हे काम वेळेत पूर्ण  करण्याचे  अधिकार्‍यांना बैठकीत निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्या केंद्रीय मंत्री समितीला भेटणार

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मंगळवारी (दि. 7) दिल्लीला खाण संदर्भात नेमण्यात आलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या समितीला भेट देणार आहेत. गोवा अधिवेशनात खाण संबंधी 1987 सालच्या कायद्यात दुरुस्ती करून खाणी पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी  ते करणार आहेत. आजारावरील दुसर्‍या टप्प्याचे उपचार घेण्यासाठी गुरुवार दि. 9 रोजी पर्रीकर अमेरिकेला जाणार आहेत. त्यांची प्रकृती सध्या सुधारली असली तरी  नियमित तपासणीसाठी त्यांना न्यूयॉर्कला जावे लागणार असून लवकरच परतणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.