Thu, Jun 27, 2019 14:06होमपेज › Goa › अन्न व औषध प्रशासन संचालिकेविरूद्ध तक्रार

अन्न व औषध प्रशासन संचालिकेविरूद्ध तक्रार

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 24 2018 11:41PMपणजी : प्रतिनिधी

फार्मेलिनयुक्‍त मासळीप्रकरणी अ‍ॅड. राजीव गोम्स यांनी अन्‍न व औषध प्रशासनाच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांच्याविरोधात गुन्हा अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. मासळीला फार्मेलिन लावण्यात आल्याचा संशय असूनदेखील सरदेसाई यांनी 12 जुलै रोजी मासळीचे 17 ट्रक जप्‍त करण्याऐवजी ते मडगाव घाऊक मासळी बाजारात पाठवून दिले. त्यामुळे सरदेसाई यांच्या विरोधात   भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी   गोम्स यांनी तक्रारीत केली आहे. 

मडगाव येथील घाऊक मासळी बाजारातील मासळीच्या अन्‍न व औषध प्रशासनाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत  फार्मेलिनचा अंश आढळून आला होता. मात्र, तरीदेखील ती मासळी जप्‍त करण्यात आली नव्हती, असे अ‍ॅड. गोम्स यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रशासनाच्या संचालिका सरदेसाई यांनी घाऊक मासळी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष  इब्राहीम  मौलाना यांच्यासोबत  व अन्य मासळी विक्री एजंटांबरोबर हे कारस्थान रचल्याचा ठपका या तक्रारीत ठेवण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत गुन्हा अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना या तक्रारीबाबत विचारले असता सदर तक्रारीची पडताळणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.