Tue, Jul 16, 2019 01:35होमपेज › Goa › प्रतिमा कुतिन्होंविरोधात महिला आयोगाचीही तक्रार 

प्रतिमा कुतिन्होंविरोधात महिला आयोगाचीही तक्रार 

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 11 2018 1:36AMपणजी : प्रतिनिधी

सांगे येथील विनयभंग झालेल्या पीडित अल्पवयीन युवतीची ओळख सार्वजनिक केल्यासंदर्भात गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी नाईक यांनी प्रदेश महिला काँग्रेस  अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांच्या विरोधात पोलिस महासंचालक  डॉ. मुक्‍तेश चंदर यांच्याकडे मंगळवारी तक्रार दाखल केली.याप्रकरणी प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा कुतिन्हो यांच्यावर कडक कारवाई करावी.  पीडितांची ओळख गुप्‍त राखलीच पाहिजे.  पब्लिसिटी स्टंट तसेच राजकीय हेतूने प्रेरीत गोष्टींना आळा बसणे आवश्यक असल्याचेही नाईक यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 

कुतिन्हो यांनी अत्याचार झालेल्या पीडित युवतीची ओळख 4 व 8 जुलै रोजी जाहीर केली, हा गुन्हा ठरतो. कुतिन्हो यावेळी पीडित युवती व तिच्या बाळासह आयोगाच्या कार्यालयात आल्या होत्या. त्यांच्यासोबत 15 जण  तसेच काही मीडियाचे  प्रतिनिधीदेखील हजर होते. सर्वांसमोर यावेळी कुतिन्हो यांनी पीडितेची ओळख  जाहीर केली, असे नाईक यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे पीडितेची ओळख सार्वजनिक होत असल्याने माध्यमांमध्येही नाराजी व्यक्‍त करण्यात आली होती. कुतिन्हो यांनी 4 व 5 जुलैच्या घटनेनंतर 8 जुलै रोजी पुन्हा सांगे येथील पीडित अल्पवयीन युवतीची ओळख सार्वजनिक  केल्याने कुतिन्हो यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नाईक यांनी तक्रारीत केली आहे. 

कायद्यानुसार कारवाई : कश्यप

अल्पवयीन पीडित युवतीची ओळख सार्वजनिक केल्याचा आरोप करून  प्रदेश महिला काँग्रेस प्रतिमा कुतिन्हो यांच्या विरोधात आतापर्यंत पोलिस खात्याकडे  तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेतली जाणार असून कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे    गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी सांगितले.  अल्पवयीन पीडित युवतीची ओळख जाहीर करणे, हा ‘पॉस्को’अंतर्गत गुन्हा ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.