होमपेज › Goa › आयकॉनिक पर्यटनस्थळासाठी कोलवा किनार्‍याची निवड

आयकॉनिक पर्यटनस्थळासाठी कोलवा किनार्‍याची निवड

Published On: Apr 08 2018 2:11AM | Last Updated: Apr 08 2018 2:11AMपणजी : प्रतिनिधी

दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध  कोलवा समुद्रकिनारा आपले रूप पालटण्यासाठी सज्ज झाला आहे. केंद्र सरकारच्या  आयकॉनिक पर्यटनस्थळ विकास प्रकल्पाअंतर्गत कोलवा किनार्‍याची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार  किनार्‍याचा विकास केला जाणार आहे. देशभरातील अन्य 11 समुद्रकिनार्‍यांचीही या आयकॉनिक पर्यटनस्थळ विकास प्रकल्पासाठी  निवड करण्यात आली असल्याची माहिती गोवा पर्यटन खात्याच्या सूत्रांनी दिली.

देशी-विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या कोलवा किनार्‍याचा या आयकॉनिकप्रकल्पाअंतर्गत साधल्या जाणार्‍या विकासासाठी तयार केल्या जाणार्‍या मास्टरप्लानबाबत केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या सचिव रश्मी वर्मा यांनी गोवा पर्यटन खात्याच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. या किनार्‍याच्या विकासात रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास, स्थानिक संस्कृतीचा विकास आदींचा यात समावेश असणार आहे. वर्मा यांनी कोलवा किनार्‍याला भेट देऊन त्याची पाहणी केली. 

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी वर्मा यांच्याकडे सीआरझेडच्या कडक नियमांनुसार  अनेक विकासकामांमध्ये बाधा येत असल्याचे सांगितले. याबाबत लक्ष द्यावे, अशी मागणी केली. कोलवा किनार्‍यानंतर गोव्यातील अन्य किनार्‍यांचादेखील या आयकॉनिक  पर्यटनस्थळ विकास प्रकल्पा अंतर्गत विकास व्हावा, यासाठी हा प्रकल्प झाल्यानंतर त्याचा खास ब्लू प्रिंट तयार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्मा यांनी आयकॉनिक  पर्यटनस्थळ विकास प्रकल्पाबाबतच्या बैठकीत गोव्याचे पर्यटन सचिव आर.पी. सिंग, पर्यटन संचालक मिनीनो  डिसोझा, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे संचालक निखील देसाई यांचा सहभाग होता.

 

Tags : goa, goa news, Colva coast, iconic tourist,