होमपेज › Goa › तटरक्षक दलाचे केरळमध्ये उल्लेखनीय बचावकार्य

तटरक्षक दलाचे केरळमध्ये उल्लेखनीय बचावकार्य

Published On: Aug 20 2018 1:36AM | Last Updated: Aug 19 2018 11:57PMपणजी : प्रतिनिधी

भारतीय तटरक्षक दलाने केरळातील 2500 हून अधिक लोकांना पूरग्रस्त भागातून सुखरूप बाहेर काढल्याचे दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तटरक्षक दलाने शनिवारपर्यंत पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे 2507 लोकांना वाचवले आहे. दलाचे सुमारे 510 जवान केरळात पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आले असून 35 लहान जेमिनी बोटींचा वापर करण्यात आला आहे. 19 जणांना हेलिकॉप्टरमधून उचलण्यात आले असून सुमारे 6415 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांसाठी 2950 अन्नाच्या पॅकेट्सचे वितरण केले तसेच हवेतून सुमारे 650 अन्न पॅकेट्स टाकण्यात आले आहेत. या मोहिमेत एक मृतदेह सापडला . 

केरळमधील भारतीय तटरक्षक दलाच्या माहे मुख्यालयातून 31 बचाव मोहिमा आखण्यात आल्या होत्या. प्रत्येक पथकानेे जेमिनी लाईफ राफ्टस्, लाईफ जॅकेट्स, लाईफ बुयोस, दोरखंड आणि अन्य साधनांचा वापर केला. गोव्यातील तटरक्षक दलाच्या अतिरिक्‍त अधिकारी आणि कर्मचार्‍यांनीही परावूर आणि वारपुझा येथील बचाव मोहिमेत सहभाग घेतला होता, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.