Fri, Apr 19, 2019 08:14होमपेज › Goa › घाऊक मासळी विक्रेत्यांचे गाडे बंद करा

घाऊक मासळी विक्रेत्यांचे गाडे बंद करा

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 11:20PM

बुकमार्क करा

दाबोळी : प्रतिनिधी

खारीवाडा येथील घाऊक मासळी विक्रेत्यांचे गाडे लवकरात लवकर बंद करावेत अशी मागणी करुन तेथील किरकोळ मासे विक्रेत्यांनी वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा यांना मंगळवारी घेराव घेतला. याविषयी 27 डिसेंबर रोजी दोन्ही विक्रेत्यांबरोबर मुख्याधिकारी, आरोग्य खाते अधिकार्‍यांची संयुक्त बैठक बोलावून योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्‍वासन आमदार आल्मेदा यांनी दिले.

येथील घाऊक तसेच किरकोळ मासळी विक्रेत्यांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून वाद सुरु असून त्यावर तोडगा निघाला नसल्याने मंगळवारी पुन्हा येथील मासळी मार्केट मधील महिला विक्रेत्यांनी आपला मोर्चा मुरगांव पालिका मुख्याधिकारी तसेच वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा यांच्याकडे वळविला. खारीवाडा येथील घाऊक विक्रेते आपल्या गाड्यावर सर्व तर्‍हेचे मासे घाऊक दराने विकत असल्याने येथील मासळी मार्केट मधील विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला  असल्याचे त्यांनी मुख्याधिकारी तसेच आमदारांच्या कानावर घातले.  लमाण्यांनी आपला मासळी व्यवसाय वाढवून शहराच्या कानाकोपर्‍यात बसून तसेच वाड्यांवाड्यावर फिरून मासळी विकत असल्यानेही गिर्‍हाईक मासळी मार्केटकडे पाठ फिरवत आहेत, असे त्यांनी सांगितले.

मार्केटमध्ये मासळी विकण्यास जीवाचे रान करावे लागत आहे, असे येथील मासळी विक्रेत्यांनी आपली कैफीयत आमदार कार्लूस आल्मेदा तसेच पालिका मुख्याधिकार्‍यांना सांगून   विक्रेत्यांचे गाडे तसेच लमाण्यांचा व्यवसाय बंद पाडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी  केली. आपण याविषयी 27 डिसेंबर रोजी संयुक्त बैठक बोलावून यावर योग्य तो तोडगा काढणार, असे आश्‍वासन आमदार कार्लूस आल्मेदा यांनी दिले.  

योग्य तो निर्णय  घेतला जाईल, असे आश्‍वासन मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडीस यांनी  दिले. दरम्यान  सकाळपासून मासळी विक्रेत्यांनी बंद पुकारून मासे विक्री केली नसल्याने   बुधवारी मासे खवय्यांची तारांबळ उडाली.