Thu, Jul 18, 2019 00:04होमपेज › Goa › फोंडा परिसरात स्वच्छता मोहिमेचा ‘कचरा’

फोंडा परिसरात स्वच्छता मोहिमेचा ‘कचरा’

Published On: Feb 11 2018 12:54AM | Last Updated: Feb 10 2018 11:49PMफोंडा : प्रतिनिधी

फोंडा परिसरात विविध ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला कचर्‍याचे ढिगारे दिसून येत आहेत. शापूर बांदोडा येथील कदंबा बसस्थानकाजवळ व बेतोडा बगलरस्त्यालगत   तसेच अन्य ठिकाणी  गेल्या काही दिवसांपासून पडलेला कचरा लोकांना त्रासदायक ठरत आहे. रस्त्याच्या बाजूला पडलेला कचरा पाहून स्वच्छ भारत अभियान भविष्यात यशस्वी होणार का,असा प्रश्न  उपस्थित होत  आहे. 

शापूर येथील कदंब बसस्थानकाजवळ फर्मागुडीच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यालगत सध्या कचर्‍याचा ढिग  दिवसेंदिवस वाढत आहे. फर्मागुडी येथील महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी याच भागातून  पायी ये-जा करीत असल्याने कचर्‍यामुळे विध्यार्थ्यांना नाकावर रुमाल धरण्याची  वेळ येते. याठिकाणी कचर्‍याचे ढिगारे झाल्यानंतर अज्ञातांकडून कचर्‍याला आग लावली जाते. आगीमुळे विद्यार्थ्यांबरोबर परिसरातील लोकांना आगीमुळे पसरणारा धूर त्रासदायक ठरत आहे.  

बेतोडा येथील बगल रस्त्याच्या बाजूलाही कचरा टाकलेला दिसून येतो. यावरून घरात स्वच्छता मोहीम राबवणारे लोक रस्त्यालगत कचरा टाकून सरकारच्या मोहिमेचा  कचरा असल्याचे दिसून येते. फोंडा परिसरातील फर्मागुडी-कुर्टी, कुर्टी-बोरी व बोरी फर्मागुडी या बगल रस्त्यांवर फेरफटका मारल्यास कित्येक मालवाहू ट्रक रस्त्यालगत पार्क केलेले दिसतात. मालवाहू  ट्रक चालक परिसरात कचरा टाकत असल्याने तसेच नैसर्गिक विधी रस्त्याच्या बाजूला करीत असल्याने स्थानिकांना विनाकारण दुर्गंधी सहन करावी लागत आहे. त्यामुळे स्वतःचे  घर स्वच्छ ठेवून घरातला कचरा मात्र रस्त्याच्या बाजूला टाकून  लोक गावात कचरा पसरवत आहेत. हा प्रकार थांबवणे गरजेचे आहे, असे शिवसेनेचे घनश्याम नाईक यांनी सांगितले.

फोंडा पालिकेबरोबर परिसरातील पंचायतींनी  कचरा प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सकाळच्यावेळी कित्येक जण घरचा कचरा कामावर जाताना रस्त्यालगत आणून टाकतात. अशा लोकांविरुद्ध कडक कारवाईची गरज आहे. फोंडा परिसरात अनेक मंदिरे असल्याने कित्येक पर्यटक देवदर्शनासाठी दररोज येतात. मात्र रस्त्यालगत पडलेल्या कचर्‍याचे ढिगारे पाहून गोव्याचे वेगळे चित्र त्याच्या समोर उभे राहण्याची शक्यता आहे. म्हणून सरकारने कचर्‍यासंबंधी अधिक जागृती करणे गरजेचे आहे,असेही नाईक  म्हणाले. 

अ‍ॅड. रामदास गावडे (तिमयेकर) यांनी सांगितले, की प्रत्येकाने स्वतःचा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणे  टाळले पाहिजे. रस्त्यावर टाकण्यात येणार्‍या कचर्‍यामुळे भटकी गुरे व कुत्र्यांचा संचार वाढतो. त्यामुळे अपघात होण्याची अधिक शक्यता आहे. प्रत्येकाने स्वतःच्या कचर्‍याची विल्हेवाट योग्य पध्दतीने स्वतः लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच स्वच्छ भारत अभियान मोहीम यशस्वी होण्यात मदत होईल.

दरम्यान, फोंडा शहराच्या शेजारी असलेल्या बेतोडा, बोरी, कवळे, बांदोडा व कुर्टी खांडेपार पंचायतीतर्फे आपल्या क्षेत्राचा कचरा उचलण्यात येतो. परंतु अधिकतर लोक कचरा प्लास्टिक पिशवीत घालून रस्त्यालगत  टाकतात. त्यामुळे रस्त्यावरील कचरा कुणी उचलावा यावरून पंचाईत बैठकीत बरीच चर्चा होते.