होमपेज › Goa › क्‍लॉड आल्वारीस यांना अटकपूर्व जामीन मंजूर

क्‍लॉड आल्वारीस यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Published On: Jun 30 2018 1:15AM | Last Updated: Jun 30 2018 12:38AMपणजी : प्रतिनिधी 

खाण खात्याच्या  कार्यालयाला टाळे ठोकल्याप्रकरणी  गोवा फाऊंडेनशच्या  क्‍लॉड आल्वारीस यांना पणजीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला. आल्वारीस यांना 2 ते 5 जुलै याकाळात पणजी पोलिस स्थानकात हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना पोलिसांनी अटक केल्यास त्यांची 10 हजार रुपयांच्या  वैयक्‍तिक हमीवर सुटका करावी, असेही  न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. 

आल्वारीस यांनी  12 मे रोजी पणजी येथील खाण खात्याच्या कार्यालयाला  टाळे ठोकले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात पणजी पोलिसांनी भा.दं.सं.च्या 341, 342 व 353 कलमान्वये गुन्हा नोंदवला होता. सरकारी कार्यालयाचे नुकसान करणे, सरकारी कामात अडथळा आणणे व सुरक्षा रक्षकाला सेवा बजावण्यापासून रोखणे, अशीही तक्रार नोंदवण्यात आली होती.
पणजी येथील खाण खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी आल्वारीस यांना समन्स बजावल्यानंतर त्यांनी पणजीच्या जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. आल्वारीस यांच्या अटकपूर्व जामिनाला पोलिसांनी विरोध करून त्यांची कोठडी मिळावी, अशी मागणी  केली होती.