Mon, May 20, 2019 10:39होमपेज › Goa › जहाजांवर जाणार्‍यांसाठी दहावी उत्तीर्णची अट

जहाजांवर जाणार्‍यांसाठी दहावी उत्तीर्णची अट

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 06 2018 1:10AMमडगाव : प्रतिनिधी

पैसे कमावण्याच्या उद्देशाने जहाजावर खलाशी म्हणून गेलेले हजारो भारतीय जहाज मालकांच्या आणि उच्च पदस्थ अधिकार्‍यांच्या घरात गुलामांसारखे काम करीत आहेत. त्यासाठी निरंतर डिस्चार्ज प्रमाणपत्र (सीडीसी) मिळविण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असण्याचा नियम सक्‍तीचा करण्यात आला आहे. नव्याने जहाजावर जाणार्‍या युवकांनी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, असे केंद्र सरकारच्या जहाज बांधणी मंत्रालयाचे अतिरिक्‍त सरसंचालक अमिताभ कुमार यांनी सांगितले.

माथानी साल्ढाणा संकुलात अमिताभ कुमार यांनी दक्षिण गोव्यातील खलाशांची बैठक घेतली. यावेळी नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई, खलाशी संघटनेचे अध्यक्ष डिक्सन वाझ उपस्थित होते. कुमार पुढे म्हणाले की, जहाजांवर नोकरीसाठी जाणार्‍यांनी नोंदणीकृत भरती प्रक्रियेद्वारे नोकरी स्वीकारणे अनिवार्य आहे. सीडीसी आता जहाजांवर अनिवार्य करण्यात आलेले आहे. मात्र, सीडीसी मिळवण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचा नियम केंद्र सरकारने लागू केला आहे. या नियमामुळे राज्यातील हजारो खलाशांवर संकट ओढवले आहे. गेली पंचवीस वर्षे जहाजांवर नोकरी करणार्‍या गोमंतकीय खलाशांकडे दुसर्‍या देशाची सीडीसी आहे. तसेच त्यातील अनेकजण दहावी अनुत्तीर्ण आहेत. हे खलाशी गोव्यात परतले असून त्यांनी आता भारतीय सीडीसी काशी मिळवावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

कुमार यांनी यावेळी आपली बाजू मांडताना दहावी उत्तीर्ण असण्याची सक्‍ती पूर्वीपासून होती, असे स्पष्ट केले. जहाजांवर जाण्यासाठी लागणारे ‘पीपीसी’चे प्रशिक्षण घेणे त्यावेळी सक्तीचे होते. पण आता 2017 च्या अधिसूचनेत प्रशिक्षणाच्या नियमांबरोबरच अन्य नियम शिथिल करण्यात आल्याची माहिती अमिताभ कुमार यांनी दिली. अमिताभ कुमार पुढे म्हणाले की, शिक्षण नसल्याने खलाशांना गुलमासारखे काम करावे लागत आहे. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी जुन्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जहाजांवर नोकरीला जाण्याची इच्छा असलेल्या युवकांनी नोंदणीकृत एजंटमार्फत नोकरी मिळवण्यासाटी प्रयन्त करावेत. परराष्ट्र मंत्रालयाकडे नोंदणीकृत एजंटची यादी आहे. त्यांच्यामार्फत जहाजांवर गेलेल्या खलाशांची नोंदणीसुद्धा ब्युरो ऑफ इमिग्रेशन जवळ असेल. ज्यांच्या जवळ जुनी भारतीय सीडीसी आहे त्यांच्या सीडीसीचे नूतनीकरण करण्यासाठी दहावीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. मात्र नवीन सीडीसी घेणार्‍यांना दहावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असेही कुमार यांनी सांगितले. 


खलाशी पिंटो यांनी काही जहाज व्यवस्थापनांकडून भारतीयांना भारतीय सीडीसी सक्तीची करण्यात आल्याचे सांगितले. त्यावर प्रतिक्रिया देताना कुमार म्हणाले की, मालक आणि कामगार यांच्यातील हा अंतर्गत विषय आहे.मंत्री विजय सरदेसाई यांनी नवीन अधिसूचनेत सुधारणा करण्याच्या विषयावर चर्चा केली. निवृत्त खलाशांनी त्यांना मिळणार्‍या निवृत्ती वेतनात वाढ करण्याची मागणी केली.डिक्सन वाझ म्हणाले की, हजारो खलाशी या नवीन नियमामुळे गोव्यात अडकून पडले आहेत. दहावी उत्तीर्ण नसलेल्यांना राज्य सरकार नोकर्‍या देऊ शकत नाही. त्यामुळे सीडीसी मिळवण्यासाठी सरकारने या नियमात बदल करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आग्नेल आल्बुकर्क यांनी सांगितले की, कॅरेबियनची सेलिब्रेटी आणि डिस्नेसारख्या मोठ्या कंपनींच्या व्यवस्थापनाकडून आता भारतीय सीडीसीची मागणी केली जात आहे.पूर्वी ज्या खलाशांनी दहावी उत्तीर्ण नसतांना दुसर्‍या देशांची सीडीसी मिळवून अनेक वर्षे जहाजांवर काम केले त्यांनी आता काय करावे, असा  प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

Tags : Goa, Class 10, passing, required, enter, ship