Sun, Mar 24, 2019 23:49
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › सर्व खात्यांच्या सेवा ६ महिन्यात नागरी सेवा केंद्रातून : मनोहर पर्रीकर 

सर्व खात्यांच्या सेवा ६ महिन्यात नागरी सेवा केंद्रातून : मनोहर पर्रीकर 

Published On: Jun 29 2018 12:07AM | Last Updated: Jun 28 2018 11:53PMमडगाव : प्रतिनिधी

महसूल खाते,कामगार आणि रोजगार खाते तसेच भू नोंदणी संचालनालयाशी संलग्न असलेल्या सेवा सामान्य लोकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी सर्वप्रथम सासष्टीत नागरी  सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून येत्या 15 ऑगस्ट पर्यंत अशा प्रकारची सुविधा केंद्रे इतर सहा तालुक्यातही सुरू केली जाणार आहेत. येत्या सहा महिन्यात इतर सर्व खात्यांच्या सेवा नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी  सासष्टी तालुक्यासाठी माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुलात सुरू करण्यात आलेल्या नागरिक सेवा केंद्राच्या उद्घाटन समारंभात केले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बटन दाबून नागरिक सेवा केंद्राचे उदघाटन केले.या वेळी नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई,महसूल आणि कामगार मंत्री रोहन खवंटे,मडगावचे आमदार दिगंबर कामत,बाणावलीचे आमदार चर्चिल अलेमाव,आय टी सचिव अमेय अभ्यंकर,दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी अंजली सेहरावत व  महसूल खात्याचे  अधिकरी उपस्थित होते.नागरिक सेवा केंद्राच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या सर्व सेवांचा लाभ लोकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी यावेळी केले.

मंत्री विजय सरदेसाई यांचे यावेळी भाषण झाले.सासष्टी तालुक्यांतील सात मतदारसंघाच्या आमदारांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. पण कांग्रेसच्या आमदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. आमदारांना या सेवा नको असल्या तरी त्यांच्या मतदारसंघातील लोकांना या सेवा मिळणे आवश्यक आहे. निदान त्यांच्यासाठी तरी आमदारांनी समारंभाला येऊन या सेवा मिळविण्याची प्रक्रिया समजून घेणे गरजेचे होते, अशी खंत सरदेसाई यांनी व्यक्त केली.नागरिक सेवा केंद्राच्या माध्यमातून भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होणार आहे,पण त्यासाठी जनतेने या सेवांचा जास्तीत जास्त लाभ घेणे गरजेचे आहे,असे सरदेसाई म्हणाले.अशिक्षित लोकांच्या मदती साठी या ठिकाणी मदतनीस नियुक्त करण्यात आला आहे,पण त्याला कोकणी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.बाहेर अर्ज भरून देणार्‍या दलालांना एका  अर्जासाठी दीड हजार रुपये द्यावे लागतात.सरकारी सेवा लोकांच्या दारापर्यंत नेण्यासाठी सरकार कार्य करत आहे आणि त्यासाठी संगणकाचे ज्ञान प्रत्येकाला असणे गरजेचे आहे ,असेही ते  म्हणाले.

महसूल मंत्री रोहन खवंटे यांनी  सांगितले,की ऑनलाईन सुविधा  घर बसल्या मिळवता  येतात तर ऑफलाईन सेवा या नागरिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून लोक मिळवू शकतात, असे सांगितले. विक्री दस्त करण्यासाठी लोकांना मामलेदार आणि कारकून यांच्याकडे जाण्याची  गरज नाही ,नागरी सेवा केंद्रात एकदा अर्ज करून शुल्क भरल्यानंतर अवघ्या पाच दिवसात सेल डिड मिळू शकते असे खवंटे म्हणाले.नागरी सेवा केंद्रातून रहिवाशी दाखला, जातीचा दाखला,मांत्रिज दाखला, साउंड परमिशन, नैसर्गिक आपत्ती साठी अर्ज,उत्पन्न दाखला, जमिनीची विभागणी करण्यासाठी लागणारे सोपस्कर, एक आणि चौदाचा उतारा,कामगार आणि रोजगार खात्याच्या अंतर्गत येणारी सर्व कामे,सर्व्हे प्लॅन, डी क्रमांकाचा फॉर्म आदी सर्व कामे होत असल्याने लोकांवर यापुढे रांगेत राहण्याची आणि सरकारी कार्यालयात हेलपाटे घालण्याची वेळ येणार नाही.आणि येणार्‍या काळात शिक्षण,समाज कल्याण व कृषी खात्याच्या योजना या सेवा केंद्राच्या माध्यमातून पुरवल्या जातील, असे महसूलमंत्री म्हणाले.या ठिकाणी लोकांना मदत करण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमण्यात आलेला आहे.लोकांना पुन्हा पुन्हा आपली कागदपत्रे दाखल करावी लागणार नाहीत,असे मंत्री म्हणाले.

आमदार चर्चिल आलेमाव यांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर बोलताना वीज खंडित समस्या केवळ एका मतदारसंघाची नसून संपूर्ण गोव्याची आहे.त्यावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तोडगा काढतील, असे खंवटे म्हणाले.जन्म दाखल्यांचा विषय कायदा खात्याच्या अख्त्यारीत असून संबंधित मत्र्यांशी चर्चा करून दाखले देण्यास विलंब होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असे ते म्हणाले.गाव स्तरावर लहान नागरी सुविधा केंद्रे सुरू केली जाणार आहेत.ज्याच्या माध्यमातून लोकांना सेवा प्राप्त होतीलच पण गावात युवकांना रोजगार पण मिळेल, असेही ते म्हणाले.

नगरीत सेवा केंद्रातील कामांचा नियमित अहवाल आपणाला पाठवला जावा अशी सूचना मंत्री खवंटे यांनी दिली आहे . आमदार दिगंबर कामत यांनी  सांगितले,की  ज्या दिवशी लोकांना या सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होतील, त्या दिवशी गुड गव्हर्नन्स योजना सफल झाली,असे म्हणता येईल.आमदार चर्चिल आलेमाव यांनी या सेवा खंडित होऊ नये,यासाठी पुन्हा पुन्हा खंडित होणार्‍या वीज व्यवस्थेवर उपाय काढावा, अशी मागणी केली.अमेय अभ्यंकर यांनी आपले विचार व्यक्त केले.जिल्हाधिकारी सेहरावत यांनी आभार मानले.