Sun, Mar 24, 2019 04:58होमपेज › Goa › पालिका कर्मचारी संघटनेच्या सदस्यांचा अध्यक्षांना घेराव

पालिका कर्मचारी संघटनेच्या सदस्यांचा अध्यक्षांना घेराव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मडगाव : प्रतिनिधी

कामाच्या वेळेत बैठक बोलविल्याने तसेच  निवृत्त कर्मचार्‍याला संघटनेवर नेमल्यामुळे संतप्त झालेल्या मडगाव नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी संघटनेचे अध्यक्ष कॉसेसांव मिरांडा यांना बुधवारी  घेराव घालून जाब विचारला. कामाच्या वेळेत  गैरहजर असल्यामुळे आम्हाला मेमो आल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्‍न विचारून सदस्यांनी अध्यक्ष मिरांडा यांना धारेवर धरले. संघटनेच्या कार्यपद्धतीबाबत सदस्यांच्या मनात अनेक शंका असून जोवर त्यांचे निरसन होत नाही, तोवर बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा  यावेळी देण्यात आला आहे.

पालिका कर्मचारी संघटनेने बुधवारी दुपारी दोन वाजता पालिका उद्यानात सदस्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी पालिकेचे शेकडो कामगार आणि कर्मचारी उपस्थित होते. मात्र, एका पदाधिकार्‍याच्या खासगी कारणामुळे बैठक सायंकाळपर्यंत स्थगित करण्यात आल्याचा निरोप घेऊन अध्यक्ष मिरांडा उद्यानात आले.  त्यावर सर्व सदस्यांनी त्यांना घेराव घातला. सर्वजण जेवण न करता बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आले आहेत. कामाच्या वेळी कर्मचारी कामाच्या ठिकाणी हजर नसल्याचे आढळल्यास आम्हाला मेमो दिला जाईल, याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्‍न स्वच्छता निरीक्षक विराज आराबेकर यांनी उपस्थित केला. सर्व कामगारांनी मिरांडा याना घेराव घालून कामगारांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी संघटना काय करीत आहे असा प्रश्‍न त्यांना विचारला.  

सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या, ग्रॅज्यूईटी, ओव्हरटाईम हे सर्व मुद्दे  प्रलंबित  आहेत, असे आराबेकर म्हणाले. एका महिला सफाई कामगाराने कर्जाच्या प्रकरणावरून प्रश्‍न उपस्थित केला. मुलाच्या लग्नासाठी आपण भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता.आता लग्नाला सहा महिने उलटून गेले आहेत पण कर्ज मंजूर झाले नाही, असे त्यांनी सांगितले. मोठ्या अधिकार्‍याला निवृत्तीच्या दुसर्‍याच दिवशी त्याचे सर्व लाभ प्राप्त होतात. पण एखादा कामगार निवृत्त झाल्यास त्याचा भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅज्युईटी देण्यास  दीर्घकाळ टाळाटाळ केली जाते, असे सांगण्यात आले.

विराज आराबेकर यांनी मिरांडा यांना धारेवर धरून ही पालिका कर्मचारी संघटना आहे, त्यामुळे निवृत्त  कर्मचार्‍यांनी संघटनेच्या कामकाजात लुडबुड करू नये, असे  सुनावले.रोजंदारीवर काम करणारे 12-15 वर्षांपासून सेवेत कायम होण्याची वाट पाहत आहेत. निवृत्त झालेले कर्मचारी स्वतःच्या स्वार्थासाठी रोजंदारीवर भलत्यांनाच घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असेही आराबेकर यांनी सांगितले.

मिरांडा यांना मडगाव पालिका कर्मचारी संघटनेच्या खात्यात किती पैसे आहेत, याची विचारणा करून  संघटनेच्या खात्यातील निधी अखिल गोवा कर्मचारी संघटनेच्या खात्यात जात असावा, असा संशय आराबेकर यांनी व्यक्‍त केला. यापुढे बैठका उद्यानात न घेता मुख्याधिकार्‍यांची परवानगी घेऊन पालिकेच्या सभागृहात  घ्याव्या, अशी मागणी राजू जामुनी यांनी केली

मुख्याधिकर्‍यांच्या आदेशानुसार रात्रीच्या वेळी बेकायदेशीर गाड्यावर कारवाई केली होती. अनिल नामक एक व्यक्‍तीने आपणाविरोधात कामगार आयुक्‍तांकडे तक्रार केली होती. मडगाव पालिकेत अनेक स्टेनोग्राफर लिपिकाचे काम करत असून शिपाई कनिष्ठ कारकूनाचे काम करीत आहेत. त्यावर कोणी  तक्रार का दाखल करत नाहीत, असा प्रश्‍न आराबेकर यांनी उपस्थित केला. निवृत्त कर्मचारी अनिल शिरोडकर यांनी पायउतार व्हावे, असेही त्यांनी मिरांडा यांना सांगितले. अध्यक्ष कॉसेसांव मिरांडा म्हणाले,की अनिल शिरोडकर हे संघटनेचे ज्येष्ठ सदस्य असून त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळते. शिरोडकर यांनी संघटनेच्या पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी संघटनेच्या सदस्यांनी केली आहे. पण नियमानुसार सर्व प्रश्‍न सोडविले जातील.


  •