Tue, May 21, 2019 18:53होमपेज › Goa › खाणप्रश्‍नी मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटणार : आ. दीपक पाऊसकर

खाणप्रश्‍नी मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटणार : आ. दीपक पाऊसकर

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 11:40PMपणजी : प्रतिनिधी

खाणबंदी प्रश्‍नावर तोडगा काढून लवकरात लवकर खाणी सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्याआधी राज्यातील सर्व आमदारांशी ते वैयक्‍तिकरित्या चर्चा करणार आहेत, अशी माहिती सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर यांनी दिली. 

सर्वोच्च  न्यायालयाने दिलेल्या खाणबंदीच्या आदेशावर तोडगा काढण्यासाठी गुरूवारी दुपारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बोलावलेली बैठक अचानक रद्द करण्यात आली. सभापती तथा साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत, कुडचडेचे आमदार निलेश काब्राल, पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे, डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर आदी खाणपट्ट्यातील बहुतांश आमदार अनुपस्थित राहिल्याने गुरूवारची बैठक पुढे ढकलण्यात आली. मात्र, सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर यांनी पर्रीकरांना भेटून आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडण्याची संधी घेतली.

मुख्यमंत्री पर्रीकर यांना भेटल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाऊसकर म्हणाले की, सध्या पावसाळा असल्याने खाणी बंद असल्या तरी येत्या ऑक्टोबरनंतर तरी तातडीने खाण व्यवसाय सुरू होणे गरजेचे आहे. यामुळे  खाणी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जो तोडगा निघेल, तो स्वीकारण्याची आमची तयारी आहे. राज्यातील बहुतांश नागरिकांना अध्यादेश काढणे हाच सर्वोत्तम उपाय वाटत आहे. मात्र, खाणींच्या लिजेसच्या ‘पर्यावरण परवान्या’ला  ही (ईसी) मुदतवाढ मिळाली तरच हे शक्य आहे. अन्यथा नव्याने ‘ईसी’ मिळवण्यासाठी वर्ष लागत असेल तर हा पर्यायही कुचकामी ठरेल, असे मत पाऊसकर यांनी व्यक्‍त केले. 

खाण उद्योजकांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

‘गोवा लोह खनिज निर्यातदार संघटने’चे प्रतिनिधी तथा खाण उद्योजक अंबर तिंबलो,  शिवानंद साळगावकर यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची गुरूवारी सकाळी भेट घेतली. यावेळी  खाण खात्यातल्या अधिकार्‍यांनीही हजेरी लावली होती.  या बैठकीत खाणी सुरू करण्याच्या सर्व पर्यायांवर चर्चा करण्यात आली.  विद्यमान खाणींच्या लिजेसना मुदतवाढ दिल्यासच खाणी लवकर सुरू करणे शक्य आहे. मात्र, अशी मुदतवाढ फक्‍त अध्यादेश काढला तरच शक्य असल्याबद्दल एकमत झाले. यामुळे लोकसभेत अध्यादेश काढावा, अशी मागणी घेऊन मुख्यमंत्री पंतप्रधानांना पुढच्या आठवड्यात भेटण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

खाणबंदीवर तोडग्यासाठी तीन पर्याय 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खाणबंदीवर तोडगा काढण्यासाठी तीन पर्यायांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अध्यादेश काढणे, लिजांचा लिलाव पुकारणे आणि सरकारी महामंडळ स्थापन करून खाण व्यवसायावर नियंत्रण ठेवणे, असे हे तीन पर्याय आहेत.