पणजी : प्रतिनिधी
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा तसेच अन्य विविध बांधकाम प्रकल्पांचा शनिवारी पर्वरी येथील सचिवालयात मुख्यमंत्र्यांच्या कक्षात झालेल्या बैठकीत आढावा घेतला.
सदर बैठकीला सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते. झुवारी नदीवरील नवा पूल, तिसर्या मांडवी पुलाच्या कामाबरोबरच राष्ट्रीय महामार्ग क्र.4 च्या कामाचा आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री पर्रीकर हे तीन महिने अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर 14 जून रोजी गोव्यात परतले. त्यानंतर 15 जूनपासून त्यांनी पर्वरी येथील सचिवालयात जाऊन कामकाजास सुरुवात करून अनेक फाईल्स हातावेगळ्या केल्या आहेत.
मुख्य सचिव, पोलिस महासंचालक यांच्यासोबत बैठक घेण्याबरोबरच त्यांनी विकासकामांचा आढावाही घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सोमवार दि.18 रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. जवळपास तीन महिन्यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.