Tue, Jul 23, 2019 01:58होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांकडून मुंगूल येथील रस्त्याच्या कामाची पाहणी

मुख्यमंत्र्यांकडून मुंगूल येथील रस्त्याच्या कामाची पाहणी

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 11:34PM

बुकमार्क करा
मडगाव : प्रतिनिधी

मुंगूल, बाणावली येथे पश्‍चिम दिशेकडील बगल मार्गाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी नगरविकास मंत्री विजय सरदेसाई व आमदार चार्चिल आलेमाव, आमदार लुईझिन फालेरो यांच्यासह केली. या कामांतर्गत पावसाचे पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना केली जाईल, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, या ठिकाणी पाणी साचत असल्याच्या तक्रारी लोकांनी केल्या होत्या. या संबंधी सरकारी विभागातील तज्ज्ञांशीचर्चा करून तोडगा काढला जाईल. रस्त्याच्या आराखड्यात दुरुस्ती करण्यासंदर्भात, बदल करायचा की काँक्रिटचे खांब काढून त्यावर पूल बनवायचा, या विषयी संबंंधितांशी चर्चा केली जाईल.पाणी अडण्यासाठी हा रस्ता कारणीभूत ठरू नये, याची दक्षता घेतली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

नद्यांच्या गाळ उपशाला नद्यांचे राष्ट्रीयीकरण आड येणार नाही का, असा प्रश्‍न पत्रकारांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांना विचारला असता, नद्यांचे राष्ट्रीयीकरण ही पत्रकारांची संकल्पना आहे, असे ते म्हणाले. गोव्यात कोणत्याही नदीचे राष्ट्रीयीकरण होणार नाही. नद्यांतील गाळ उपसण्यासाठी नॅशनल वॉटरवेज ऑथोरिटीच्या परवानगीची आवश्यकता असते. पण, त्यांनी आधीच गोवा सरकारशी सामंजस्य करार केला असून यामध्ये राज्य सरकारला सर्व अधिकार दिले आहेत. त्यामुळे किती खोलीपर्यंत गाळ उपसावा, किती उपसावा यावर राज्य सरकार निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गाळ उपशाला ड्रेजिंग म्हणता येणार नाही आणि ड्रेजिंग करायचे झाल्यास सरकारला संपूर्ण साळ नदी स्वच्छ करण्यासाठी 50 कोटी रुपयेसुद्धा कमी पडतील. यासाठी सरकारला केंद्र सरकारची मदत घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. मुंगूल येथील बगल रस्त्यामुळे पावसाचे पाणी येथून वाहून जाऊ शकत नाही, अशी लोकांची तक्रार आहे यावर उपाय काढण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, छोटेखानी पुलांची उभारणी केली जाईल. यासाठी खास आराखडा तयार करण्याची गरज भासणार नाही. 9 किंवा 12 मीटर लांबीचे पूल बांधून साचलेल्या पाण्याला मार्ग करून दिले जाईल, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.

नद्यातील गाळ उपसणे हा एकमेव पर्याय आहे, अन्यथा पाणी साचण्याचे प्रकार सुरूच राहतील, असे आमदार चर्चिल आलेमाव म्हणाले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी नावेली येथे लोकांची भेट घेऊन चर्चा केली.