Wed, Mar 20, 2019 02:37होमपेज › Goa › मुख्यमंत्री सोमवारी कार्यालयात

मुख्यमंत्री सोमवारी कार्यालयात

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 12:11AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सध्या दोनापावला येथील आपल्या निवासस्थानातूनच शासकीय कामकाज पाहत आहेत. गोमेकॉच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिथूनच ते शासकीय फाईल्स हातावेगळ्या करत आहेत. ते येत्या सोमवारी कार्यालयात येणार असून बुधवारी मंत्रिमंडळाची बैठकही घेणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. 

पर्रीकर मुंबईमधील लीलावती इस्पितळातून आठवडाभर उपचार घेऊन गुरुवारी अचानक गोव्यात दाखल झाले. लोकांकडून होऊ शकणारा संसर्ग (इन्फेक्शन) टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रवास व वाहतूक टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात कर्मचारी तसेच लोकांशी संपर्क येण्याची भीती असल्याने पर्रीकर यांनी दोनापावला येथे त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहणे पसंत केले आहे. पणजीहून सुमारे किलोमीटर अंतरावर दोनापावला येथे पर्रीकर यांचे निवासस्थान आहे. तिथेच सरकारी फाईल्स तूर्त पाठविल्या जात असून मुख्यमंत्री तिथूनच काम करत आहेत, असे त्यांच्या कार्यालयातील एका अधिकार्‍याने  सांगितले. 

मुख्यमंत्र्यांकडे एकूण 23 खाती  असून त्यापैकी दहा खाती जास्त  महत्त्वाची आहेत. बहुतेक फाईल्स ह्या अर्थ खात्याशी व गृह खात्याशी निगडित असतात. तातडीच्या फाईल्स दोनापावला येथे पर्रीकरांकडे पाठवून दिल्या जात आहेत.  मुख्यमंत्री पर्रीकर शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस तरी  दोनापावला येथे राहणार आहेत.सोमवारपासून ते कार्यालयात येण्याची शक्यता असल्याने सोमवारपासून पूर्ण पद्धतीने त्यांचे शासकीय काम सुरू राहणार आहे. पर्रीकर यांनी इस्पितळातून डिस्चार्ज घेतला असला तरी आपल्या  कामात खंड पडू दिलेला नाही. मात्र, घरी राहिल्याने त्यांना थोडी अधिक विश्रांती मिळत आहे. पर्रीकर रविवारपर्यंत आल्तिनो येथील शासकीय महालक्ष्मी बंगल्यातही येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.