Thu, Jan 17, 2019 12:23होमपेज › Goa › फेरविचार याचिकेला मुख्यमंत्र्यांची मान्यता

फेरविचार याचिकेला मुख्यमंत्र्यांची मान्यता

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 16 2018 12:37AMपणजी : प्रतिनिधी

त्रिमंत्री सल्लागार समितीने खाणबंदीप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात  फेरविचार याचिका दाखल करण्याबाबत केलेल्या शिफारशीला मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अमेरिकेतून मान्यता दिली आहे. खाणबंदीचा फटका बसणार्‍या लोकांबाबत पडताळा तसेच नुकसानीचा आढावा घेण्यासाठी खाण भागातील आमदारांच्या विशेष समितीत खाण तज्ज्ञांचा समावेश करण्याची सूचनाही पर्रीकर यांनी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या खाणबंदीसंबंधी आदेशावर  फेरविचार याचिका दाखल करण्याचा सल्ला सरकारला दिला होता. ही शिफारस मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांच्यामार्फत पर्रीकर यांना कळविल्यावर त्यांनी सदर फेरविचार घालण्यास हरकत नसल्याचे कळविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

खाणबंदीचा फटका बसणार्‍या लोकांची माहिती तसेच नुकसानीचा आढावा घेण्यासाठी खाण भागातील आमदारांची समिती तयार करण्याची शिफारसही सल्लागार समितीने केली होती. त्या समितीत खाण विषयक तज्ज्ञांचाही समावेश करण्याची सूचना पर्रीकर यांनी केल्याचे सांगण्यात आले. 

ना. गडकरी 20 रोजी गोव्यात : ढवळीकर

राज्य सरकार एका बाजूने सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यावर फेरविचार याचिका दाखल करणार आहे. दुसर्‍या बाजूने खाणींची लिलाव प्रक्रिया जलदरीत्या व्हावी, म्हणूनही प्रयत्न करणार आहे, असे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी खाणग्रस्तांशी प्रत्यक्ष चर्चा  करण्यासाठी येत्या मंगळवारी गोव्यात येणार आहेत. गडकरी 20 रोजी सकाळी 11 वाजता खाण भागातील आमदार, खाण मालक तथा ट्रक, बार्ज व अन्य यंत्रणा मालकांच्या शिष्टमंडळालाही भेटणार आहेत. गडकरी बायणा-वास्को येथील जेटीचे उद्घाटन करणार असल्याचेही  ढवळीकर यांनी सांगितले.