होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर उद्या राज्यात परतणार

मुख्यमंत्री पर्रीकर उद्या राज्यात परतणार

Published On: Aug 27 2018 1:13AM | Last Updated: Aug 27 2018 12:26AMपणजी : प्रतिनिधी

मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली असून ते मंगळवारपर्यंत राज्यात परततील, अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली आहे. 

मुख्यमंत्री पर्रीकर गेल्या बुधवारी (दि.22) सायंकाळी अमेरिकेहून अकरा दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते. न्यूयॉर्कमधील ‘स्लोन केटरिंग’ स्मृती रुग्णालयात ते उपचार घेत होते. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि गोमेकॉचे डॉक्टर  कोलवाळकर हेही अमेरिकेला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी गोव्यात परतल्यानंतर विश्रांती घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी विश्रांती घेतली नाही.   दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजप नेत्यांकडून हाती घेतला व ते  लोकांच्या गर्दीत  सहभागी होऊन अर्धा किलोमीटर चालत गेले. त्यानंतर ते खासगी गाडीने आपल्या निवासस्थानी निघून गेले. 

पर्रीकर गुरुवारी सकाळी पर्वरी येथील मंत्रालयात आले नसल्याने अधिकार्‍यांना शंका आली होती.  गुरूवारी दुपारीच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि उलट्या सुरू झाल्या. यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मुंबईला आणण्यास सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री तातडीने त्यांच्या पुत्रासह गुरूवारी लिलावती रुग्णालयात दाखल झाले. काही महिन्यांपूर्वी लिलावती रुग्णालयातच पर्रीकर यांनी स्वादूपिंडाशी संबंधित आजारावर आठवडाभर उपचार घेतले होते. त्यानंतर ते पुढील उपचारांसाठी अमेरिकेला गेले होते.