Mon, May 20, 2019 18:04होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अमेरिकेतून दोन मंत्र्यांंशी साधला सुसंवाद

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अमेरिकेतून दोन मंत्र्यांंशी साधला सुसंवाद

Published On: Apr 18 2018 12:48AM | Last Updated: Apr 18 2018 12:48AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळातील दोघा मंत्र्यांना सुखद धक्का देत अमेरिकेतून त्यांच्याशी संवाद साधला. पर्रीकर यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे व आपल्याशी संपर्क साधून आपली प्रकृती ठिक असल्याची माहिती दिल्याचे नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले. 

पर्वरी येथील मंत्रालयात तीन मंत्र्यांच्या सल्लागार समितीची मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता बैठक ठरली होती. मंत्री सुदिन ढवळीकर व फ्रान्सिस डिसोझा हे या बैठकीला वेळेत पोहोचले. मात्र, मांडवी पुलाजवळ एका वाहन अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मंत्री सरदेसाई हे बैठकीला उशिरा पोहोचले. सरदेसाई बैठकीला येत असतानाच पावणेपाच वाजण्याच्या सुमारास पर्रीकर यांचा सरदेसाई यांना फोन आला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील विशेष सेवा अधिकारी रुपेश कामत हे सध्या अमेरिकेत आहेत. कामत यांच्या फोनवरून पर्रीकर यांचा प्रथम मंत्री सरदेसाई यांना फोन आला. 

या संबंधीची माहिती मंत्री सरदेसाई यांनी पत्रकारांना दिली. मंत्री सरदेसाई म्हणाले की, पर्रीकर यांचा आपल्याशी अलिकडे संवाद झाला नव्हता. आपणही त्यांच्या उपचार प्रक्रियेत व्यत्यय नको म्हणून फोन करत नव्हतो. मात्र, कामत यांच्या मोबाईल फोनवरून आपल्याला मंगळवारी सायंकाळी पर्रीकर यांचा फोन आला व आपल्याशी पर्रीकर बराचवेळ बोलले. मंत्रिमंडळ सल्लागार समिती खाणप्रश्नी चर्चा करणार असल्याचे आपण त्यांना सांगितले. तसेच त्यांना आपल्या मतदारसंघातील भेटीबाबतही माहिती दिली. पर्रीकर यांनी आपल्यावर तिसर्‍या टप्प्यातील उपचार सोमवारी सुरू होणार असल्याचे सांगितले. पर्रीकर यांचा आवाज हा पूर्वीच्या तुलनेत आपल्याला बरा वाटला. तीन आठवड्यांनंतर ते गोव्यात येतील.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, आपल्यालाही मंगळवारीच सायंकाळी पर्रीकर यांचा फोन आला, त्यांनी आपल्याशी चर्चा केली. पर्रीकर यांची प्रकृती सुधारली आहे.

Tags : goa news, Chief Minister Parrikar,  organized dialogue, two ministers,