Thu, May 23, 2019 20:57
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › ‘गोवा माईल्स’मुळे टॅक्सी व्यवसायात तिपटीने वाढ शक्य

‘गोवा माईल्स’मुळे टॅक्सी व्यवसायात तिपटीने वाढ शक्य

Published On: Aug 07 2018 12:59AM | Last Updated: Aug 06 2018 11:48PMपणजी : प्रतिनिधी

राज्यात तयार करण्यात आलेल्या ‘गोवा माईल्स’ या अ‍ॅपचा टॅक्सी चालकांना लाभ होणार आहे. या अ‍ॅप सुविधेमुळे टॅक्सी चालकांच्या व्यवसायात आधीच्या तुलनेत तिपटीने वाढ होणार आहे. त्यानुसार कमाईतही वाढ होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. ‘गोवा माईल्स’ या अ‍ॅपचा सोमवारी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते प्रारंभ झाला. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, या टॅक्सी अ‍ॅपमुळे अल्पावधीत टॅक्सी व्यवसायाची क्षमता तिपटीने वाढणार आहे. आजवर क्षमता असतानाही योग्य तंत्रज्ञान नसल्याने व्यवसाय संधी वाया जात होती. सदर अ‍ॅप जीपीएसवर आधारित असल्याने ग्राहकांना योग्य भाडे आकारले जाईल व ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकारही थांबतील. 

पर्यटनमंत्री आजगावकर म्हणाले, या अ‍ॅपच्या वापरासाठी टॅक्सी चालकांना आपल्या खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. ‘गोवा माईल्स’मुळे टॅक्सी चालक तसेच ग्राहकांना उत्तम सेवेबरोबर सुरक्षाही मिळणार असून एक फोन कॉलद्वारेही  टॅक्सी दारात पोहोचणार आहे. टॅक्सी चालकांनी काही त्रास पोहोचवल्यास ग्राहकही अ‍ॅपच्या मदतीने तक्रार करू शकतो व तक्रारीस अनुसरून योग्य कारवाईही केली जाईल. 

 टॅक्सीचालकांना शिस्त लागेल

‘गोवा माईल्स’ अ‍ॅपच्या मदतीने राज्यातील टॅक्सी चालकांनी राज्यात तसेच राज्याबाहेरही चांगली सेवा देऊन नाव कमवायला हवे. टॅक्सीचालकांबाबत यामुळे ग्राहकांमध्ये विश्‍वास निर्माण होईल. काही टॅक्सी चालकांमुळे अन्य राज्यांतील टॅक्सी चालकांचे नाव बदनाम होत आहे. या ‘अ‍ॅप’मुळे टॅक्सी चालकांना एकप्रकारची शिस्त लागणार आहे.    

 - मनोहर (बाबू) आजगावकर, पर्यटन मंत्री

साडेतीनशे टॅक्सींचा उपक्रमात समावेश

राज्यातील सुमारे 3 हजारांहून अधिक टॅक्सी चालकांनी गोवा माईल्स अ‍ॅपसाठी जीटीडीसीकडे संपर्क साधला आहे. परंतु, सध्या फक्‍त साडेतीनशे टॅक्सींना प्रायोगिक तत्त्वावर या उपक्रमात सामावून घेतले आहे. हे अ‍ॅप नव्यानेच लागू झाल्याने सुरळीत व्हायला वेळ लागणार असून टप्प्याटप्प्याने आम्ही अधिक टॅक्सी चालकांचा यात समावेश करणार आहोत. हे अ‍ॅप फक्‍त अडीच दिवसांत 6 हजारांहून अधिक गोमंतकीय व पर्यटकांनी डाऊनलोड केले आहे , पुढे  ही संख्या वाढत जाईल.  ग्राहक रोख किंवा कार्डच्या मदतीने भाडे भरू शकतात. हे पैसे टॅक्सी चालकांच्या खात्यात जमा होतील. टॅक्सी चालकांच्या खिशाला चिमटा न काढता हे अ‍ॅप ग्राहकांच्या जलद व सोयीस्कर वापरासाठी बनविण्यात आले आहे.

-  नीलेश काब्राल