Thu, Jun 27, 2019 13:54होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर पुन्हा सक्रिय

मुख्यमंत्री पर्रीकर पुन्हा सक्रिय

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 12:03AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी माशेल व पणजी येथील मंदिरांना भेटी देऊन देवदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सचिवालयात जाऊन फाईलींचा निपटारा केला. अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी अधिकार्‍यांशी सलग बैठका घेऊन चर्चा केली. भाजप आघाडी सरकारातील बहुतांश मंत्री-आमदार तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही पर्रीकरांना भेटून शुभेच्छा दिल्या. 

पर्रीकर यांनी शुक्रवारी प्रथम त्यांचे कुलदैवत असलेल्या माशेल येथील श्रीकृष्ण मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. त्यांचे थोरले पुत्र उत्पल तसेच विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत हेही त्यांच्यासोबत यावेळी होतेे. त्यानंतर पर्रीकर पणजीचे ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिरात आले.  पणजीतील भाजपचे शेकडो कार्यकर्ते व पर्रीकर यांचे समर्थक तसेच काही व्यावसायिक, उद्योजक यावेळी जमले होते. स्मितहास्य करून त्यांना पर्रीकर यांनी अभिवादन  केले. ‘ऑल द बेस्ट, भाई’ असे म्हणत कार्यकर्त्यांनी त्यांना दुरूनच हात दाखवला. यावेळी ते थोडे भावूकही झाले, तरी त्यांनी कुणाशीही बोलण्याचे टाळले.     

महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन  गर्भकुडीला प्रदक्षिणा घातली व तीर्थ-प्रसाद घेऊन ते या मंदिर परिसरातील अन्य देवळांमध्ये गेले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता. 
अमेरिकेत गेले तीन महिने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर गुरुवारी गोव्यात दाखल झालेल्या पर्रीकर यांनी विश्रांती न घेता दुसर्‍याच दिवसापासून कामाला सुरुवात केली. देवदर्शनानंतर पर्रीकर यांनी थेट पर्वरीतील सचिवालय गाठले. आपल्या कार्यालयात त्यांनी महत्वाच्या फाईली पाहून त्यावर शेरा मारण्यास प्रारंभ केला. प्रधान सचिव पी. कृष्णमूर्ती, मुख्य सचिव धर्मेश शर्मा, पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर तसेच अन्य काही अधिकार्‍यांशी त्यांनी चर्चा करून अनेक विषयांचा आढावा घेतला व काही सूचना केल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मंत्री-आमदारांच्या भेटीगाठी 

पर्रीकर यांनी शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भोजनासाठी आपल्या घरी जाऊन आल्यानंतर 3 वाजता पुन्हा कामकाजाला सुरुवात केली. सचिवालयात मंत्री सुदिन ढवळीकर वगळता अन्य मंत्र्यांनी पर्रीकर यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, आमदार निळकंठ हळर्णकर आणि आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही पर्रीकरांना भेटून प्रकृतीची विचारपूस केली. 

लोकांनी संयम बाळगावा : सभापती

विधानसभेचे सभापती डॉ.  प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना  सांगितले की, मुख्यमंत्र्यांना गोमंतकीयांनी थोडा वेळ द्यावा. पर्रीकर चौदा तासांचा विमान प्रवास करून अमेरिकेहून आले आहेत. काही प्रशासकीय अडचणी दूर करून गोव्याचे प्रशासन पुन्हा एकदा वेगाने पुढे नेण्यासाठी सर्वांनीच  पर्रीकर  यांना थोडा वेळ द्यायला हवा. पर्रीकर यांना भेटण्याची अनेकांना उत्सुकता असली तरी लोकांनी संयम बाळगावा. 

पर्रीकरांचे गोमंतकीयांना ‘देव बरे करू!’ 

सुमारे तीन महिन्यांच्या वैद्यकीय उपचारानंतर राज्यात परतलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी आपल्या पहिल्या व्हिडिओ संदेशात  गोमंतकीय जनतेचे आशीर्वाद मागून राज्याच्या भल्यासाठी आणि विकासासाठी कार्य करण्याचे वचन दिले. पर्रीकर यांनी आपल्या ट्विटरवरील व्हिडीओ संदेशात म्हटले आहे की, आपण आजारी होतो, त्यावेळी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, पाठिंब्याने आणि प्रार्थनेमुळे उपचार घेऊन राज्यात परतू शकलो. आपल्या आशीर्वादामुळे पुन्हा कामात सक्रिय झालो असून, असाच आशीर्वाद कायम असावा, ही मागणी. गोव्याच्या विकासासाठी  आपल्या सेवेत रूजू होऊ शकलो.  देव बरे करू...!