Sun, Mar 24, 2019 16:46होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर लिलावतीत दाखल

मुख्यमंत्री पर्रीकर लिलावतीत दाखल

Published On: Aug 24 2018 12:42AM | Last Updated: Aug 23 2018 11:20PMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना तातडीच्या उपचारासाठी मुंबईच्या लिलावती इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गुरूवारी पर्रीकर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

स्वादूपिंडच्या आजारावर उपचारासाठी अमेरिकेस गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 12 दिवसांनंतर बुधवारी गोव्यात परतले होते. मुख्यमंत्री गेल्या 10 ऑगस्ट रोजी वैद्यकीय तपासणी व उपचारांसाठी अमेरिकेला गेले होते. पर्रीकर यांना गुरूवारी औषधोपचारानंतर अस्वस्थ वाटले, तसेच उलटीचा त्रास झाला. ही माहिती लिलावती इस्पितळाच्या डॉक्टरांना कळवली असता, त्यांनी पर्रीकर यांना तातडीने मुंबईला येण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पर्रीकर, पुत्र उत्पल पर्रीकर आणि गोमेकॉचे डॉ. कोलवाळकर यांच्यासह गुरूवारी संध्याकाळी 4.15 वाजता विमानाने मुंबईला रवाना झाले. पर्रीकर शनिवारपर्यंत गोव्यात परत येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज वाजपेयींच्या अस्थिंचे विसर्जन

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिंचे विसर्जन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.24) होणार आहे. मुख्यमंत्री पर्रीकर मुंबईला उपचारांसाठी गेल्याने त्यांच्याऐवजी मंत्री नाईक मांडवी नदीत संध्याकाळी सव्वा पाच वाजता  पणजीतील कॅप्टन ऑफ पोर्ट जेटीकडे अस्थि विसर्जन करतील.  खासदार विनय तेंडुलकर त्यांच्या सोबत असतील. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता कुठ्ठाळी फेरी धक्क्याकडून फेरीबोटीतून   भाजप खासदार नरेंद्र सावईकर व अन्य आमदारांच्या उपस्थितीत झुआरी नदीत अस्थि विसर्जित केल्या जाणार आहेत. .