Mon, Jun 17, 2019 04:47होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर अमेरिकेच्या ‘मेमोरियल स्लोन’ मध्ये दाखल

मुख्यमंत्री पर्रीकर अमेरिकेच्या ‘मेमोरियल स्लोन’ मध्ये दाखल

Published On: Mar 08 2018 1:50AM | Last Updated: Mar 08 2018 12:02AMपणजी : प्रतिनिधी

अमेरिकेतील ‘मेमोरीयल स्लोन केटेरींग सेंटर’  (एमएसके) या इस्पितळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर उपचार होणार आहेत. भारतीय वेळेनुसार पर्रीकर बुधवारी संध्याकाळी 5.30 वाजता  मुंबईहून न्यूयॉर्कला पोहोचले असून बुधवारी रात्रीच ते या इस्पितळात दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मुख्यमंत्री पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा क्षार (पॅनक्रियाटीक सीस्ट्स) आजार असल्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेतील इस्पितळातच  प्रभावी उपचार होऊ शकतात, असे त्यांना मुंबईतील डॉक्टरांनी सुचविले आहे. सुमारे 130 वर्षे जुने असलेल्या ‘एमएसके’ मध्ये जागतिक दर्जाचे  शल्यविशारद, गॅस्ट्रोएनटेरोलॉजीस्ट पॅनक्रियाटीकच्या आजारावर उपचार करतात. डॉ. विलियम जर्निगन, डॉ. पीटर अ‍ॅलन, डॉ. विनोद भालचंद्रन, डॉ. रॉबर्ट कर्ट असे तज्ज्ञ डॉक्टर या विभागात सेवा देतात. इथल्या कर्करोगावर नव्या उपचारांच्या सुविधा विकसित करण्यात हातखंडा आहे. मुख्यमंत्री सुमारे 20 ते 25 दिवस उपचारासाठी या इस्पितळात राहू  शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.