होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती स्थिर

मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती स्थिर

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 12:20AMपणजी : प्रतिनिधी

अन्नातून विषबाधा झाल्याने मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असून अनेक चाचण्या घेतल्या जात आहेत. डॉ. पी. जगन्नाथ यांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर सौम्य ‘पॅनक्रियाटिटीस’वर उपचार सुरू असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत असतानाच मुख्यमंत्री पर्रीकर अचानक  आजारी पडल्याने राज्यातील भाजप नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण  आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने शुक्रवारी काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की,  पर्रीकर यांची प्रकृती चांगली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांना सौम्य ‘पॅनक्रियाटिटीस’चा आजार असून ते येत्या दोन दिवसांत पुन्हा कार्यालयात दाखल होतील .पर्रीकर यांना लिलावती इस्पितळात गुरूवारी सकाळी दाखल केले. त्यांचे दोन्ही पुत्र व सुरक्षारक्षकही त्यांच्यासोबत आहेत.  

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे मुंबईला दाखल झाले आहेत. गोवा फॉरवर्डचे नेते तथा कृषीमंत्री विजय सरदेसाई, मगो नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर तसेच भाजपचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते शनिवारी मुंबईला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

पंतप्रधान मोदींकडून प्रकृतीबाबत विचारणा

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या प्रकृतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनाच खास फोन करून  विचारणा केली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही पर्रीकर यांना फोनवर संपर्क साधल्यानंतर पर्रीकर यांची प्रकृती लवकर सुधारावी, असा संदेश सोशल मीडियावर टाकला आहे. केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनीही ‘लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करत आहे’ असा संदेश आपल्या ट्विटरवर टाकला आहे.