Tue, Jul 23, 2019 02:18होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकरांचे गोव्यात आगमन

मुख्यमंत्री पर्रीकरांचे गोव्यात आगमन

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 15 2018 12:06AMपणजी : प्रतिनिधी

सुमारे तीन महिने अमेरिकेतील इस्पितळात उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गुरुवारी (दि.14) राज्यात आगमन झाले. अमेरिकेहून दुपारी 2.45 वाजता मुंबईत  आणि मुंबईहून ते 5.30 वाजता गोव्यातील दाबोळी विमानतळावर दाखल झाले.  कडेकोट  पोलिस बंदोबस्तात पर्रीकर आपल्या दोनापावला येथील खासगी निवासस्थानाकडे रवाना झाले.  

दरम्यान, पर्रीकर काही दिवस विश्रांती घेणार असल्याने शुक्रवारी (दि.15) बोलावलेली मंत्रिमंडळ  बैठक पुढे ढकलल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री पर्रीकर मुंबईहून दाबोळी विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाने संध्याकाळी 5.30 वा. उतरले. तपासणीचे    सोपस्कार झाल्यानंतर ते 6.20 वाजता विमानतळाच्या गेटबाहेर पडले. उत्पल आणि अभिजीत हे त्यांचे पुत्र त्यांच्यासोबत होते. यावेळी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर तसेच अमेय अभ्यंकर, स्वप्नील नाईक आदी काही उच्चपदस्थ सरकारी अधिकारी उपस्थित होते. भाजपचा एकही आमदार, मंत्री, नेते हजर नव्हते. विमानतळावर कडेकोट बंदोबस्त होता. पर्रीकर यांना थेट दोनापावला येथील निवासस्थानी नेण्यात आले. 

मुख्यमंत्री पर्रीकर फेब्रुवारी महिन्यात स्वादूपिंडाशी संबंधित  विकारावर उपचारासाठी प्रथम मुंबईतील इस्पितळात दाखल झाले होते. नंतर  ते  येथील बांबोळीच्या  गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल झाले होते. गेल्या 8 मार्चपासून त्यांना अमेरिकेतील ग्लेन मेमोरियल इस्पितळात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. 

पर्रीकर आज घेणार महालक्ष्मी देवीचे दर्शन   

दीर्घ उपचारानंतर गोव्यात परतलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे काही दिवस विश्रांती घेणार असून  शुक्रवारी (दि. 15) पणजीची ग्रामदेवता महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी    सकाळी 10 वाजता  महालक्ष्मी मंदिरात जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.  ‘तीन दिवसांनी भेटू’ 

दोनापावला येथील खासगी निवासस्थानाबाहेर पत्रकारांनी गर्दी केली होती. काही  माध्यमांच्या पत्रकारांनी पर्रीकरांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले, ‘आता नको,  तीन दिवसांनी भेटू’. पर्रीकर यांच्या या विधानावरून   सोमवारपासून ते आपल्या कामाचा ताबा घेतील, असे  संकेत आहेत.

पर्रीकरांचे सस्मित अभिवादन

मनोहर पर्रीकर यांच्यावरील उपचार यशस्वी झाले असून त्यांची प्रकृती सुधारली आहे. दाबोळी विमानतळावर बाहेर पडताना त्यांच्या चेहर्‍यावर  जुनेच स्मितहास्य होते. आपल्या चाहत्यांना आणि भाजप कार्यकर्त्यांना पाहून त्यांनी हात उंचावून अभिवादन केले. मनोहर पर्रीकर राज्यात परतल्याने गोवा भाजपमध्ये व मंत्रिमंडळातही उत्साह संचारला आहे.

पर्रीकरांचा उपचार प्रवास

 15 फेब्रुवारी : स्वादूपिंडाच्या आजारामुळे मुंबईत लीलावती इस्पितळात दाखल.
 22 फेब्रुवारी : लीलावतीमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर विधानसभेत अर्थसंकल्प सादर. 
 25 फेब्रुवारी : गोमेकॉत दाखल.
 28 फेब्रुवारी : गोमेकॉतून डिस्चार्ज.
 5 मार्च : लीलावती इस्पितळात तपासणी.
 6मार्च : उपचारासाठी अमेरिकेला रवाना.
 8 मार्च : अमेरिकेतील ग्लेन मेमोरियल इस्पितळात दाखल.
 14 जून : पर्रीकरांचे गोव्यात आगमन.